कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची छाननी विभागीय उपनिबंधकांनी सुरू केली आहे. तक्रारीतील मुद्देनिहाय तरतुदीची तपासणी करून निर्णय दिला जाणार असून मंगळवारी सभेबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.
‘गोकुळ’ची १५ सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सभेच्या कामकाजाचा अहवाल सहायक निबंधक (दुग्ध) अरूण चौगले यांनी विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे पाठविला आहे.
हा अहवाल व तक्रारीतील मुद्दे याची सांगड घालून सोमवारी शिरापूरकर यांनी प्रत्येक मुद्याची छाननी सुरू केली आहे. तक्रारीतील मुद्देनिहाय तरतुदी काय आहेत? त्याची अंमलबजावणी संघ प्रशासनाने केली आहे काय? याची सखोल तपासणी करून सभेचे कामकाज योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय ते देणार आहेत. साधारणता मंगळवारी याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.
अहवालावरील कार्यवाहीची प्रत दुग्ध आयुक्तांबरोबररच तक्रारदार व दूध संघाला ते पाठविणार आहेत. या निर्णयावरच ‘गोकुळ’च्या सभेचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याने विभागीय उपनिबंधकांच्या निर्णयाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.