कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अल्प मोबदल्यात लोकांकरिता राजर्षींच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्याबद्दल मूर्तिकार जग्गू मारवाडी यांचा खंडोबा वेताळ तालीम ठोंबरे आखाड्याच्या वतीने वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते मानाचा भगवा फेटा, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जग्गू मारवाडी हे राजस्थानातून जुना वाशी नाका परिसरात झोपडीत राहून छत्रपती शिवाजी महाराजांसह महान व्यक्तींचे पुतळे बनवून त्यांच्या विक्रीतून चरितार्थ चालवितात. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अगदी अल्प मोबदल्यात महाराजांचे हुबेहूब पुतळे बनवून लोकांना दिले. याबद्दल आखाड्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी करवीर काशी फौंडेशनचे सुनीलकुमार सरनाईक होते. मावळा शाहीर मिलिंद सावंत यांनी प्रास्ताविक केले. किरण जाधव यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब शिकलगार, आनंदराव थोरात, बाबासाहेब पवार, मिलिंद बसुगडे, शाहूराज सावंत, अथर्व जाधव, शिवतेज ठोंबरे, सरला गायकवाड, शिवानी ठोंबरे, आदी उपस्थित होते.
फोटो : १५०७२०२१-कोल-ठोंबरे आखाडा
कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील खंडोबा वेताळ ठोंबरे आखाड्याच्या वतीने मूर्तिकार जग्गू मारवाडी यांचा सत्कार करताना आनंदराव ठोंबरे, सुनीलकुमार सरनाईक, मिलिंद सावंत, किरण जाधव, आदी उपस्थित होते.