सांगली : एलबीटी (स्थानिक संस्था कर) वसुलीसाठी महापालिका क्षेत्रातील ४० व्यापाऱ्यांची बँक खाती महापालिकेने आज (शनिवारी) सील केली. महापालिकेच्या कारवाईचा धडाका पुन्हा सुरू झाल्याने दिवसभरात १८२ व्यापाऱ्यांनी १ कोटी २० लाख रुपये जमा केले. एलबीटीची दोन दिवसांत एकूण २ कोटी ३० लाख रुपयांची वसुली झाली आहे. एलबीटीच्या वसुलीसाठी महापालिकेने यापूर्वी ४२ व्यापाऱ्यांची खाती सील केली होती. त्यातील आठ व्यापाऱ्यांची खाती पूर्ववत केली आहेत. शनिवारी पुन्हा चाळीस व्यापाऱ्यांची खाती सील केल्याने ही संख्या ७४ झाली आहे. आचारसंहितेच्या काळात आणखी काही व्यापाऱ्यांची बँक खाती सील केली जाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. सुमारे पन्नासहून अधिक व्यापाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली. विक्रीकर विभागाकडे नोंद असलेल्या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांबाबत संभ्रम आहे. विक्रीकर विभागाकडील बँक खात्यावर व्यापाऱ्यांचे व्यवहारच सुरू नाहीत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या खात्यांची माहिती बँकांकडून घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या तीन दिवसांतील एलबीटीची वसुली ३ कोटी ३३ लाख रुपये झाली आहे. एलबीटी नोंदणीकडेही व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे. आजअखेर दहा हजारांहून अधिक व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने महापालिकेच्या तिजोरीला काहीसा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
‘एलबीटी’साठी चाळीस व्यापाऱ्यांची खाती सील
By admin | Published: September 21, 2014 12:40 AM