कोल्हापूर : वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीच्या ४३. ७८ हेक्टर जमिनींचा शाेध घेण्यात आला आहे. या शोधमोहिमेत प्रकल्पग्रस्तांनीच पुढाकार घेतला असून, श्रमिक मुक्तीदलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन ४६ व्या दिवशीही सुरू राहिले.
प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल घेत ५ मार्चला इचलकरंजी उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत शिबिर लावून पुनर्वसनासाठीच्या जमिनींचा शोध घेण्याचा निर्णय झाला होता. याअंतर्गत कुंभोज सर्कल ५.१२ हेक्टर, क।। वडगाव १३.२० हेक्टर, वाठारतर्फ वडगाव सर्कल ५.४६ हेक्टर आणि जयसिंगपूर सर्कलमध्ये २० हेक्टर अशा ४३.७८ हेक्टर जमिनींचा शोध लागला आहे. या जमिनींची आज गुरुवारी ग्रामस्थांच्या बैठका घेऊन गाव कमिटीच्या सहीने पसंत्या दिल्या जातील.
शाहूवाडी तालुक्यातील वन विभागाच्या व शेतीलायक जमिनींची पाहणी झाली असून, पसंत केलेल्या जमिनी पुनर्वसनासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन वन विभागाने दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदाेलन सुरू असून, येथे मारुती पाटील, डी. के. बोडके उपस्थित होते.
--