कोल्हापूर : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेक आणि दंगलीतील दंगेखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले आहे. तरीसुद्धा संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त कायम आहे.आक्षेपार्ह स्टेटस लावल्याच्या कारणावरून हिंदुत्ववादी संघटनांतर्फे बुधवारी (दि. ७) ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात आली होती. या दरम्यान शहरातील काही भागांत दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांसह लाठीमार करीत जमावाला पांगविले. या प्रकरणी ३६ जणांना पोलिसांनी अटक केली होती, तर ४०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले. दगडफेक झालेल्या भागांतील सीसीटीव्ही फुटेज पाहून दंगेखोरांची ओळख पटविण्याचे काम शुक्रवारी दिवसभर युद्धपातळीवर सुरू होते.सकाळी इंटरनेट सेवा सुरळीत झाल्याने आर्थिक व्यवहारांना पुन्हा गती आली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून सर्वच व्यवहार सुरळीत झाले. अधिकची खबरदारी म्हणून संवेदनशील भागांत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकूनअतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, आदी अधिकारी व जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील ज्येष्ठ कर्मचारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तळ ठोकून आहेत.