कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील वास्तू जतन संवर्धनाचे काम कासवगतीने सुरू आहे. गरुड मंडपासाठी यापूर्वी घडवण्यात आलेल्या लाकडी खांबांना ते बसविण्यापूर्वीच वाळवी लागली आहे, हे लाकूड निकृष्ट दर्जाचे असल्याने नव्या लाकडासाठी पुन्हा दांडेली गाठावे लागले आहे. नगारखाना व मणिकर्णिका कुंडाचेही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू असल्याचे दिसत नाही.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील नगारखाना, मणिकर्णिका कुंडाचे जतन संवर्धन करण्यात येत आहे. तर मुख्य मंदिरासमोरील गरुड मंडप पूर्ण उतरवून नव्याने बांधण्यात येणार आहे. हे काम पुरातत्व खात्यामार्फत केले जात आहे. वर्क ऑर्डर होऊन सहा महिने उलटून गेले तरी एकाही वास्तूमधील काम पुढे सरकलेले नाही.गरुड मंडपासाठी मिळालेले लाकूड अन्य शहरात घडवून कोल्हापुरात आणले गेले; पण हे बसविण्यापूर्वी पाहतो तर काय त्यांच्या तळालाच वाळवी लागलेली होती. काही ठिकाणी पाण्याने लाकूड खराब झाले होते. हा प्रकार दिसताच पुरातत्व खात्याचे सहसंचालक विलास वहाने यांना कळविण्यात आले. त्यांनीही हे खांब वापरण्यास ठेकेदाराला मनाई केली.
गरुड मंडपासाठी २० फूट उंचीचे ८ मोठे खांब लागणार आहेत. अस्सल सागवानी व दर्जेदार लाकूड मिळविण्यासाठी देवस्थान समितीच्या सचिवांनी दांडेली गाठल्याचे समजले. तेथे अपेक्षित प्रमाणात तीन मोठे लाकडांचे ओंडके मिळाले आहेत. उर्वरित लाकडे वन विभागाकडून मिळवून देण्यात येणार आहे. त्यामुळे गरुड मंडपाचे काम सुरू झालेले नाही.नगारखान्याचा वरचा भाग उतरविला आहे. पण त्याची पुनर्बांधणी अजून सुरू झाली नाही. त्याचे विटा बनविणे सुरू आहे. मणिकर्णिका कुंडाचे दगड त्र्यंबोली टेकडीवर घडविण्यात येत होते. त्याचे पुढे काय झाले, काम कुठपर्यंत झाले याची माहिती नाही अशी सध्याची अंबाबाई मंदिर आवारातील स्थिती आहे.
निवडणुकीचा अडसर संपला.. वेगाची प्रतीक्षाआधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा प्रशासनावर मोठा ताण होता. सहा महिने निवडणुकीच्या धामधुमीतच गेले. जिल्हाधिकारी हेच देवस्थान समितीचे प्रशासक असल्याने त्यांना या काळात अंबाबाई मंदिराकडे लक्ष देता आले नाही. पण आता ही रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून विकासकामांना गती द्यावी, हीच अपेक्षा आहे.