कोल्हापूर : वृध्देचा खून केल्यानंतर मृतदेहाचे काही अवयव व हत्यार अद्याप पोलिसांना मिळालेले नाही. त्याचा राजाराम तलावात शोध घ्या, त्यासाठी प्रशिक्षित पाणबुड्यांची (स्कुबा डायव्हिंग) मदत घ्या, अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात राजाराम तलावात शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लोभापायी पाचगाव येथील शांताबाई शामराव आगळे (वय ७५) या वृध्देचा शुक्रवारी (दि. ५) खून करून तिचे तुकडे करून ते राजाराम तलावासमोरील कृषी महाविद्यालयाच्या माळावर फेकले होते. ते पोलिसांना मिळाले.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष निवृत्ती परीट (३५, रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, टाकाळा) याला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली. पण मृतदेहाचे तुकडे केल्याबाबत मौन पाळले. पोलिसांना मृतदेहाचे शीर, डावा हात, कमरेपासूनचा खालील भाग मिळाला, पण अद्याप धड व गुन्ह्यात वापरलेले हत्यार मिळाले नसल्याने पोलीसही चक्रावले आहेत.पोलिसांना तपासकामात संशयित आरोपी परीट हा सहकार्य करत नसल्याचे लक्षात आले. संशयिताने मृतदेहाचे धड व हत्यार राजाराम तलावात फेकल्याचा संशय आहे, त्यानुसार प्रशिक्षित पाणबुड्यांची मदत घेऊन राजाराम तलावाच्या पाण्यात शोधमोहीम राबवा, अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यादृष्टीने येत्या दोन दिवसात पाणबुड्यांची मदत घेऊन राजाराम तलावात मृतदेहाच्या उर्वरित अवयवांचा शोध घेण्यात येणार आहे.सावकारांचीही होणार तपासणीदरम्यान, संशयित आरोपी परीट याने खासगी सावकारांकडून व्याजाने काही रक्कम उचलली होती, ती भागविण्यासाठी त्याने वृध्देचा खून केल्याचीही माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे काही खासगी सावकारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.