कोल्हापूर : वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमिनींचा शोध घेतला जात असून, शनिवारी हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, हिंगंगाव, नरंदे, वाठार तर्फ उदगाव, खोची, भेंडवडे, लाटवडे, सावर्डे, भादोले, किणी, क. वडगाव, घुणकी, चावरे, तळसंदे, पारगाव व अंबप, या गावांमध्ये कॅम्प घेण्यात आला. दरम्यान ४० व्या दिवशीही श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन सुरूच राहिले.
प्रकल्पग्रस्तांची ५ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्यासोबत बैठक झाली होती. यात वारणा धरणाच्या लाभक्षेत्रात संपादन पात्र, संपादन झालेल्या मात्र लपून राहिलेल्या जमिनींचा शोध घेऊन १५ एप्रिलच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे ठरले होते. यासह सध्या वन खात्याच्या जमिनीदेखील दाखवण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी शिये, कासारवाडी या गावांच्या जमिनी दाखवण्यात आल्या. उद्या, सोमवारी शाहूवाडी तालुक्यातील आंबा, ऐनवाडी, चांदोली, गावांच्या जमिनी दाखवण्यात येणार आहेत.
शासनाने जाहीर केलेले नियम व जमावबंदी आदेशानुसार चार माणसे ठेवून आंदोलन सुरूच राहणार असून, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. यावेळी मारुती पाटील, अशोक पाटील, प्रकाश बेलवलकर, शंकर पाटील, पांडुरंग कोठारी, वसंत पाटील उपस्थित होते.
--
फोटो नं १००४२०२१-कोल-श्रमिक आंदाेलन
ओळ : प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलचे ठिय्या आंदोलन शनिवारी कोरोना नियमांचे पालन करत सुरूच ठेवण्यात आले.
--