जयसिंगपूर : येथील पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. ही वस्तू ठेवणारा नेमका व्यक्ती कोण, याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. प्रथमदर्शनी संशयिताचे फुटेज मिळाले असले तरी त्याला ओळखण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे महामार्गावर असणाऱ्या अंकली टोलनाका याबरोबरच अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सोमवारी करण्यात आली.
शहरातील पायोस हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि. १९) एका व्यक्तीने प्रवेशव्दारासमोरच पिशवी ठेवली होती. या पिशवीत वरच्या बाजूला केळी होती. त्यामुळे हॉस्पिटलच्या आतील बाजूस ती पिशवी ठेवण्यात आली होती. रविवारी ही पिशवी हॉस्पिटलजवळील मोकळ्या मैदानात टाकल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने याची तपासणी केली. यावेळी त्यामध्ये कोणताही स्फोटक पदार्थ नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीबरोबरच महामार्गावर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांचा तपास सुरू आहे.