लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरून दबाव आणणाऱ्यांचा शोध घ्यावा व त्यांना योग्य ती समज द्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार, अधीक्षक मोहिते यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. अध्यक्ष लुमाकांत नलवडे म्हणाले, ‘अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक आणि विरुद्ध काही जनता’ या विषयावर बुधवारी (ता. २१) ‘आयबीएन लोकमत’चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी चर्चासत्र घेतले होते. यानंतर राजगोळकर यांना सोशल मीडियावर अपशब्द वापरून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा निषेध करा, असा संदेश सर्वत्र दिला आहे. कोणत्याही माध्यमातील पत्रकार हा प्रामाणिकपणे घडलेल्या घटनांचे वृत्तांकन करीत असतो. त्याची काही संकुचित प्रवृत्तीचे लोक अपशब्द वापरून नाहक बदनामी करतात. असे संदेश सोशल मीडियावर दिले आहेत, त्यांचा शोध घ्यावा. यावर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना तत्काळ त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला समज देण्यास सांगितले. यावेळी उपाध्यक्ष तानाजी पोवार, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, संदीप राजगोळकर, पांडुरंग दळवी, पांडुरंग पाटील, शीतल धनवडे, कृष्णात पुरेकर, शुभांगी तावरे, शीतल धनवडे, सतीश सरीकर, समीर मुजावर, संभाजी थोरात, संपत नरके, ज्ञानेश्वर साळोखे, अनिल देशमुख, विनोद सावंत, सचिन सावंत, प्रथमेश कात्राट, प्रताप नाईक, विजय केसरकर, आशिष आडिवरेकर, ओंकार धर्माधिकारी, रवी पाटील, विठ्ठल बिरंजे, मिथुन राजाध्यक्ष, रवी कुलकर्णी, सतेज औंधकर, सुनील काटकर, सुनील पाटील, बाळासाहेब कोळेकर, भूषण पाटील, प्रिया सरीकर, इंदुमती गणेश, शिवाजी साळोखे, श्रद्धा जोगळेकर, यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधी, छायाचित्रकार उपस्थित होते.
पत्रकारांवर दबाव आणणाऱ्यांचा शोध घ्यावा : कोल्हापूर प्रेस क्लब
By admin | Published: June 24, 2017 12:48 AM