विनोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत अटीतटीची निवडणूक होणाऱ्या प्रभागांमध्ये राजारामपुरी प्रभाग क्रमांक ३६ चा समावेश होतो. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. सध्यातरी इच्छुकांची संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे नेत्यांना या प्रभागात उमेदवार शोधावा लागणार आहे तर काहींनी सून, पत्नीला रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा हा प्रभाग भेदण्याचे आव्हान भाजप, ताराराणी आघाडीसमोर आहे.
मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू असे संमिश्र रहिवासी असणारा राजारामपुरी प्रभाग क्रमांक ३६ असून, या प्रभागाचे काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या घोटणे, शेखर घोटणे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांचा येथे प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबाने आतापर्यंत सहावेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये शिवाजी कवाळे हे स्वत: एकदा, पत्नी कांचन कवाळे या तीनवेळा, सून कादंबरी कवाळे आणि मुलगा संदीप कवाळे हे प्रत्येकी एकदा विजयी झाले आहेत. कांचन कवाळे आणि कादंबरी कवाळे या सासू-सुनेने महापौरपद भूषविले असून, कवाळे कुटुंबियांचा या प्रभागात प्रभाव आहे. नागरिकांच्या अडीअडचणीत हे कुटुंबीय नेहमीच मदत करतात. कोरोनामध्ये प्रभागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गत निवडणुकीत संदीप कवाळे हे राष्ट्रवादीतून निवडून आले. त्यावेळी भाजप-ताराराणी आघाडीचे संग्रामसिंह निंबाळकर यांनी त्यांना तगडे आव्हान दिले होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. निंबाळकर हे २०१०पासून सामाजिक कार्यात आहेत. त्यांनी तत्कालिन आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून दोन ठिकाणी रस्ते कले आहेत. या निवडणुकीत त्यांनी पत्नी सुप्रियादेवी निंबाळकर यांना रिंगणात उतरविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कवाळे कुटुंबाने शिवाजी कवाळे यांची सून दिव्यानी आकाश कवाळे यांना रिंगणात उतरण्याचे ठरवले असून, प्रचाराही सुरु केला आहे. याचरोबर या प्रभागातील मोहन मोरे यांनी परिसरातील प्रलंबित असणारा ब सत्ता प्रकाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. या जमेच्या बाजूवरच त्यांनी या निवडणुकीत पत्नी मीना मोरे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला असून, प्रचाराचा नारळही फोडला आहे. याचबरोबर या प्रभागात चित्रा बकरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. नागरिकांचे मागासवर्गीय महिला प्रभाग आरक्षण असल्यामुळे अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. ऐनवेळी काहींकडून उमेदवारी जाहीर होण्याचीही शक्यता आहे.
प्रतिक्रिया
प्रभागासाठी सुमारे दोन कोटींचा निधी आणला असून, रस्ते, गटारांचे प्रश्न सोडवले आहेत. स्थायी समिती सभापती पदावर असताना महापालिकेच्या इमारतींसाठी वीज बचतीचा ग्रीन एनर्जी आणि मल्टिलेव्हल कार पार्किंग हे प्रकल्प मंजूर करुन घेतले आहेत. सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मशिनरी खरेदीसाठी १ कोटींचा निधी दिला. सहावी गल्लीतील रस्त्यासाठी ४५ लाखांचा निधी मंजूर असून, लवकरच काम सुरु होणार आहे.
संदीप कवाळे, विद्यमान नगरसेवक
चौकट
प्रभागात झालेली कामे
राजाराम गार्डन येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हास्यक्लबसाठी शेडची उभारणी.
प्रभागात एलईडी दिवे बसवले.
प्रभागात ट्री गार्ड बसवले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभागात बेंचची सोय
राजारामपुरी दुसरी गल्लीत पेव्हर पद्धतीने रस्ता
सहाव्या गल्लीत गटाराचे काम
चौकट
शिल्लक असलेली कामे
राजारामपुरी सहावी गल्ली रस्ता खराब
पिंपळेश्वर मंदिर परिसरातील रस्त्याची दुरवस्था
राजारामपुरी चौथी गल्लीत काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे
अरुंद गल्लीतील रस्ते, गटारांची समस्या
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
संदीप कवाळे राष्ट्रवादी २,२६३
संग्रामसिंह निंबाळकर भाजप १,०८२
रुपाली पाटील काँग्रेस १२८
रुपाली कवाळे शिवसेना १८३
प्रशांत अवघडे अपक्ष ३३०
फोटो : १८०१२०२१ कोल केएमसी राजारामपुरी प्रभाग
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या राजारामपुरी प्रभाग क्रमांक ३६ मधील सहाव्या गल्लीतील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.