कोल्हापूर : यंदाच्या वरिष्ठ गट ‘अ’ डिव्हिजन फुटबॉल हंगामासाठी ३२० खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यात आठ संघांनी १३ परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात छत्रपती शाहू स्टेडियमवर दर्जेदार खेळ पाहण्यास मिळणार आहे.स्थानिक संघामध्ये जरी स्पर्धा असली तरी त्या-त्या संघातील खेळाडूंसह समर्थकांमध्ये ईर्षा आणि फुटबॉल संघाप्रती प्रेम ठासून भरलेले असते. त्यामुळे आपलाच संघ कसा अव्वल स्थानी राहील, यासाठी संघांच्या समर्थकांसह कारभारी जीव तोडून आठ महिने या संघांच्या बांधणीसाठी खर्च करतात.
आपल्या संघात एक तरी नायजेरियन खेळाडू असावा, असे प्रत्येक संघाला वाटते. त्यामुळे संघाच्या बांधणीतील अर्धा खर्च एक किंवा दोन नायजेरियन खेळाडूवर होते. ज्या संघांची ऐपत असते, ते संघ अशा खेळाडूंना करारबद्ध करतात. यंदा नायजेरियन खेळाडूंबरोबर घाना, लायबेरिया या देशांतूनही खेळाडू कोल्हापुरात खेळण्यास इच्छुक आहेत.
या परदेशी खेळाडूंसह इतर राज्यांतील १३ नामांकित खेळाडूंनीही विविध संघांकडून नोंदणी केली आहे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांतून १५ व स्थानिक २७९ खेळाडूंनी सोळा संघांतून नोंदणी केली आहे. नोंदणी करण्यासाठी संघाचा उत्साह ओसांडून वाहणारा होता. त्यामुळे यंदा खेळात चुरस आणि जिंकण्याची जिद्द अधिक दिसणार आहे. त्या दृष्टीने अनेक संघांनी कसून सरावास सुरुवात केली आहे.परदेशी खेळाडू असे,प्रॅक्टिस क्लब ‘अ’ - सी पीटर (लायबेरिया), इमॅन्युअल (नायजेरियन), दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ - रोमॅरिक गुफांग (कॅमेरून), येईबो जेरूमे (घाना), शिवाजी तरुण मंडळ - ओबे अकीम, इथो डेव्हिड ओबेलो (नायजेरियन), पाटाकडील तालीम मंडळ (अ) - हरुणा अराफत (घाना), खंडोबा तालीम मंडळ (अ) - तेय अल्वीन जेह (लायबेरिया), फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ - अगमो रिचर्ड, नावकू मिशेल ओकोवूडली (नायजेरियन), संयुक्त जुना बुधवार फुटबॉल संघ - अवेटी रिचमंड (घाना), बी.जी.एम. स्पोर्टस - जॉन्सन जोशो, मुथू लॉवेल अजीबोलो (नायजेरियन) यांचा समावेश आहे.आमची मदार देशीवरचबालगोपाल तालीम मंडळ, मंगळवार पेठ फुटबॉल क्लब, संध्यामठ तरुण मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक, खंडोबा तालीम मंडळ (ब), पाटाकडील तालीम मंडळ (ब), ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, कोल्हापूर पोलीस संघ या संघांनी इतर राज्यातील व राज्यातील आणि आपल्या स्थानिक खेळाडूंच्या रणनीती अवलंबली आहे.