खडकेवाडा ता.कागल येथील आनंदा वासुदेव मेटकर या मेंढपाळाच्या चार बकऱ्यावर चार दिवसानंतर पुन्हा बुधवारी रात्री अज्ञात प्राण्याने पुन्हा हल्ला केला. शनिवारी झालेल्या हल्ल्यात १४ बकरी मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळे मेटकर कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले. हल्ल्याच्या स्वरूपावरून तरसच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.
गावच्या उत्तरेला आनंदा कुंभार यांच्या शेतात मेटकर यांचा मेंढ्यांचा कळप आहे. अज्ञात प्राण्याने लोखंडी जाळीवरून उडी मारून या कळपावर हल्ला केला. वनपाल बी. एन. शिंदे, डी. ए. टिकले,पशुवैद्यकीय अधिकारी व्ही.व्ही.मगदूम,तलाठी उमा कारंडे,पोलीस पाटील आप्पासाहेब पोवार, कोतवाल सुरेखा खोत यांनी तातडीने घटनेचा पंचनामा केला. यावेळी ग्रा.पं.सदस्य बाबू मेटकर, योगेश साबळे उपस्थित होते.या कुटुंबाला शासन पातळीवरून त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
कॅप्शन
खडकेवाडा येथे अज्ञात प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या मेंढ्यांचा पंचनामा करताना वन अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी