कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला वळवाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले. विजांचा कडकडाट झाला तरी कुठेही अनुचित घटना घडली नाही. काही ठिकाणी हुलकावणी, तर कुठे जोरदार आलेल्या या पावसाने उकाड्याने हैराण जिवाला गारव्याची अनुभूती दिली.
या पावसाचा उन्हाळी पिकाच्या काढणीवर परिणाम होणार असला तरी ऊस पिकासाठी पाऊस पोषक असल्याने शेतकरी सुखावला आहे. शुक्रवारी मध्य रात्रीपर्यंत पाऊस पडल्याने शनिवारी सकाळपासूनच कुंद आणि दमट वातावरण होते. प्रचंड उष्माही जाणवत होता. दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढला आणि त्यापाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवातही झाली. जोरदार आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली तरी दिवसभराच्या उष्म्यापासूनही दिलासा मिळाला. अजून दोन दिवस पावसाचे राहतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी बहुतांश लोक घरातच होते. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे बऱ्याच गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो लवकर पूर्ववत न झाल्याने घरी असूनही लोकांना सुटीचा आनंद घेता आला नाही. निवांतपणे क्रिकेट सामने पाहण्याच्या आनंदावरही पाणी सोडावे लागले.
शेतकऱ्यांची धांदल
वळवाच्या या जोरदार बरसणाऱ्या सरीमुळे शेतीच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. तथापि, या पावसाने मात्र पशुपालकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. वाळली वैरण पावसात भिजू नये म्हणून ती व्यवस्थित रचून ठेवण्याची लगबग उडाल्याचे चित्र गावात सर्वत्र दिसत आहे.