कोल्हापूर : वेगवान वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिच्या एव्हरेस्ट मोहिमेला सलग दुसऱ्या दिवशी खीळ बसली आहे. अजूनही तिच्यासह तीनशे जण वेदर विण्डो मिळेल या आशेवर कॅम्प दोनवर तळ ठोकून आहेत.
कॅम्प दोनवरील शेर्पा लोक रोप बर्फाखाली गाडले गेले आहेत. प्रचंड वाऱ्यासह बर्फवृष्टीमुळे ५० फुटांच्या पुढचे काहीही दिसत नाही. तंबूही मोठ्या प्रमाणात ओले झाले आहेत. त्यात कपडेही ओली झाली आहेत. ती वाळण्याची संधी नाही. खाण्याचे साहित्यही संपत आले आहे. दुपारचे जेवणही इतर ग्रुपकडून मागावे लागत आहे. गुरुवारी रात्रीपर्यंतची कशी तरी सोय होईल. बेसकॅम्पवरून कॅम्प दोनवर साहित्य येऊ शकत नाही. तरीसुद्धा हिंमत न हारता कस्तुरीसह अन्य गिर्यारोहक वेदर विण्डो मिळेल, अशा आशेवर आहेत. अशी माहिती गिरीप्रेमींचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी दिली आहे. त्यांनी सॅटेलाइट फोनद्वारे बेस कॅम्पशी गुरुवारी सकाळी संपर्क साधून कस्तुरीसह अन्य गिर्यारोहकांची चौकशी केली. सर्व सुखरूप आहेत. तौउतेसह यास वादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या मोहिमेत सर्वांत कमी वयाची कस्तुरी आहे. आपल्याला वेदर विण्डो मिळेल आणि समीट आपण पूर्ण करूनच कोल्हापुरात परतू, असा आशावाद कस्तुरीमध्ये आहे. म्हणूनच अजूनही ती खडतर अशा कॅम्प दोनवर इतर गिर्यारोहकांसह तळ ठोकून आहे, अशी माहिती झिरपे यांनी दिली.