कोल्हापूर केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमातंर्गत सुरू केलेल्या ई-पंचायत उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असे. त्यामुळे केंद्र शासनाने ई-पंचायत उपक्रमाच्या माध्यमातून हे सर्व आवश्यक दाखले देण्याचा उपक्रम सुरू केला होता. हे सर्व दाखले संगणकाच्या माध्यमातून तातडीने देण्याची ही योजना आहे.
देशभरात अशा पद्धतीने दाखले देण्याच्या या उपक्रमामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर राज्यात कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यवस्थापक नितीन मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी याकामी योगदान दिले.