कोल्हापूर : कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लस वापराबाबतचा निकष बदलला असून, आता जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ६३१ नागरिकांना ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा ५ हजार १५७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात येत आहे.
राज्यामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये ४ आठवड्यांचे तर कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये ६ ते ८ आठवड्यांचे अंतर ठेवण्यात येत होते. मात्र, आता केंद्र शासनाने १३ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार कोविशिल्डचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्यांच्या अंतराने द्यावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
कोवॅक्सिनच्या बाबतीत कोणताही बदल झालेला नसून दुसरा डोस चार आठवड्यांनीच घ्यावयाचा आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेले सध्या कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ६३१ नागरिक आहेत. यांना आता ८४ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि त्यांची आधीच्या नियमानुसार दुसऱ्या डोसची मुदत संपून गेली आहे, अशांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. अशा ५ हजार १५७ जणांना हा दुसरा डोस ८४ दिवसांनंतर देण्यात येणार आहे.
चौकट
लाभार्थी उद्दिष्ट पहिला डोस टक्केवारी दुसरा डोस टक्केवारी
आरोग्य कर्मचारी, अधिकारी ३८,२५६ ४१,२७९ १०८ २१,७०३ ५७
फ्रंटलाईन वर्कर २९,८२१ ५८,८३७ १९७ २३,८८७ ८०
१८ ते ४४ वयोगट १८,५२,३६८ १५,२२९ १ ४६० ००
४५ ते ६० आणि त्यावरील १५,२३,३७२ ५,७४,९१० ५१ १,७७,०७७ १२
एकूण ३४,४३,८१७ ८,९०,२४६ २६ २,२३,१२७ ६