कोल्हापूर : महानगरपालिकेला कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असल्याने गुरुवारपासून ४५ वर्षांवरील कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच दि. २९ एप्रिल ते दि. ५ मेपर्यंत ज्यांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेली आहे, अशा पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.
गेल्या पाच दिवसांपासून लस आली नव्हती, त्यामुळे सर्व केंद्रांवरील लसीकरण थांबविण्यात आले होते. केवळ १८ ते ४४ वयोगटातील २०० नागरिकांना रोज लसीकरण केले जात होते. आता पुन्हा लसीकरण होत असले तरी, दुसरा डोस घेणाऱ्यांकरिता सर्व प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या डोससाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शहरातील ४५ वर्षांवरील कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे पूर्ण संरक्षण करणे अतिमहत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राधान्याने या नागरिकांचे कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थनगर व मोरे माने नगर या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
दि. २९ एप्रिल ते दि. ५ मेपर्यंतची ऑनलाईन अपॉईंटमेंट असलेल्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. परंतु आज, गुरुवारी अशा पात्र लाभार्थींचेच कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरून कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी फोन येईल, त्यांनीच फक्त संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे. येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. ज्या ४५ वर्षांवरील नागरिकांची ऑनलाईन अपॉईंटमेंट नाही, त्यांना लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.