कोल्हापूर : ‘ओखी’ वादळ शमते न शमते तोच शनिवार (दि. ९) पासून दुसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे. हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला त्याचा फटका बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी कोल्हापुरात दिली.
डॉ. साबळे एका खासगी कार्यक्रमानिमित्त मंगळवारी कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, ‘ओखी’ वादळाने गेले तीन-चार दिवस दक्षिण भारतात धुमाकूळ घातला आहे. चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असून त्याचा ताशी वेग १८ किलोमीटर आहे.
मुंबईच्या उत्तरेच्या बाजूने गुजरात, सूरतपर्यंत वादळ पुढे जाणार असून त्याचा फटका रायगड, पालघरसह नंदूरबार जिल्ह्यांना बसणार आहे. या पावसाने रब्बी पिकांना फटका बसणार आहे. वेलवर्गीय दोडका, काकडी, कारली या पिकांना किडीचा प्रादुर्भाव जाणवणार आहे. हरभरा, गहू या रब्बी पिकांनाही त्याची झळ सहन करावी लागणार असून हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादूर्भाव होणार आहे.‘ओखी’ चक्रीवादळातून आपण सावरतो न सावरतो तोच शनिवारपासून दुसरे चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब कमी झाल्याने चक्री वारे तयार होऊन वादळ होणार आहे. या वादळाचा फटका पश्चिम महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात बसू शकतो; पण वादळाची तीव्रता ‘ओखी’पेक्षा कमी असेल, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.
ढगाळ वातावरण उसाला पोषकचढगाळ वातावरण ऊसपिकास पोषक आहे. आर्द्रता वाढत उसाची वाढ चांगली होती. कोरड्या हवामानात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.