जयसिंगपूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या वतीने महाराष्ट्रदिनी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी साखर आयुक्त सुभाष कडू पाटील यांनी आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा करून मागण्यांबाबत माहिती घेतली. साखर आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिली.उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आंदोलन अंंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर सकाळी धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. बाजारपेठेत साखरेला उच्चांकी दर असतानाही कारखानदारांकडून दुसरा हप्ता दिला जात नाही. उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ५०० रुपये देण्यात यावा. ऊसदर नियंत्रण मंडळाने ठरविलेला उसाचा अंतिम दर न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये. कारखान्यांच्या उसाचे वजन करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी कार्यवाही करावी, यासह सात मागण्यांचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले. आंदोलनात राकेश जगदाळे, अमर शिंदे, अविनाश पाटील, अक्षय पाटील, प्रभाकर बंडगर, मनोज राजगिरे, सुनील सावंत, दीपक बंडगर, दत्ता मोरे, रावसाहेब बरगाले, शशिकांत काळे, सुरेश भोसले, कृष्णात गोते, राजेंद्र पाटील यांच्यासह आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. साखर कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता द्यावा, याकडे कारखान्यांबरोबर शासनाने दुर्लक्ष केल्याने उसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले असल्याचे चुडमुंगे यांनी यावेळी सांगितले.पुणे येथे साखर आयुक्त सुभाष कडू पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, अविनाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दुसऱ्या हप्त्यासाठी साखर आयुक्तांना साकडे
By admin | Published: May 03, 2017 12:28 AM