लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये घरातले सारेच घरी राहीले, सुखी संसाराची स्वप्ने पाहताना लॉकडाऊनचा तडाखाही संसारांना बसलाच. पगार थांबला, आर्थिक ताणाताण, सासू-सास-याशी वाद, सोशल मीडियाचा अतिवापर अशा कारणांमुळे पती-पत्नीत वाद उद्भवून दुस-या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले. मार्च २०२० ते मे २०२१ या कालावधीत कोल्हापूर पोलीस दलाच्या भरोसा सेलकडे ३२२ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ९९ तक्रारी सोडवून त्यांचे संसार फुलवण्याचे कौतुकास्पद काम सेलने केले.
कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दुस-या लाटेचाही फटका बसला. पुन्हा लॉकडाऊन लावले. नोक-या गेल्या, व्यवसाय बंद पडले. पुरुषांसह महिलांचाही ताणतणाव वाढला. संसाराचा गाडा चालवताना आर्थिक चणचण भासू लागली, परिणाम पती-पत्नीच्या भांडणात गेला. माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेच्या छळाच्या घटना वाढल्या. सोशल मीडियावरील चॅटिंगमुळे पती-पत्नीच्या डोक्यावर संशयाचे भूत बसले. नोकरदार महिलांनी पूर्ण पगार घरात देण्याची भूमिका पुढे करून तिचा छळ मांडला. अशा कारणांनी दुस-या लॉकडाऊनमध्येही पती-पत्नीमध्ये जिव्हाळा कमी होऊन अंतर वाढले.
नव्याने फुलवले ९९ जोडप्यांचे संसार
संसारात छोट्या गोष्टीवरून पती-पत्नीत कुरबुरी वाढतेय. १४ महिन्यांत भरोसा सेलकडे दाखल ३२२ तक्रारींपैकी फक्त चार तक्रारींवर पोलिसात गुन्हे दाखल झाले. तर ९९ प्रकरणात पती-पत्नीतील वाद सोडवले. समुपदेशानंतर वाद मिटवत १९७ तक्रारदारांनी आम्ही परस्पर मिटवतो, अशी लेखी ग्वाही दिली.
संसार दुभंगण्यात मोबाइल, सासू ठरले कारण
भरोसा सेलमध्ये, मुलांच्या शिक्षणाला व खर्चाला पती पैसे देत नाही, पतीचे दुस-या महिलेशी मोबाइल चॅटिंग, मेसेज डिलीट केला म्हणून पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पती-पत्नीत सासूचा नको हस्तक्षेप, मुलींना नकोत सासू-सासरे या कारणांनी संसारांत विष कालवले.
परस्त्रीसोबतचे संभाषण झाले रेकॉर्ड...
पतीच्या मोबाइलमधील परस्त्रीशी संभाषणाचे रेकॉर्डींग पत्नीने काढले अन् वाद उफाळला. पत्नीने संसारास नकार दिला. वाद वाढला, समुपदेशनानंतर पतीने माफी मागितली, पुन्हा असा प्रकार करणार नसल्याची लेखी ग्वाही दिली, अन् नव्याने संसार फुलला.
श्रीमंत घरची मुलगी
श्रीमंत घरची मुलगी, मध्यमवर्गीय मुलगा यांचा काही दिवस संसार फुलला, नंतर आईकडे जसे राहणीमान तसेच मला हवे या हट्टापायी काही महिन्यांतच दोघांच्या संसारात दरी आली.
कोट..
तक्रारदार महिला व तिच्या पतीचे वादाचे मूळ शोधून त्यांची समजूत काढली जाते. पतीची चूक असेल तर त्याला समजावून सांगितले जाते, चूक गंभीरच असेल तर गुन्हे दाखल होतात. दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी भरोसा सेलचा जास्तीत जास्त पुढाकार असतो. - श्रद्धा आंबले, सहा. पोलीस निरीक्षक, भरोसा सेल
मार्च २०२० ते मे २०२१ तक्रारींची आकडेवारी...
- दाखल : ३२२
- निर्गत : १९७
- प्रलंबित : २२
- गुन्हे : ०४
दुसरे लॉकडाऊन तक्रारी (दि.????? मार्च ते मे २०२१)...
- दाखल : ४८
- समझोता : १४
- निर्गत : १७
- गुन्हे : ०१