कोल्हापूर : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर शहरातील २२७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. पहिल्या भागामध्ये एकूण १३६२७ जणांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्जाचा दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. १४) पासून सुरू झाली. त्यामध्ये कला मराठी आणि इंग्रजी माध्यम, वाणिज्य मराठी आणि इंग्रजी माध्यम, विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी २२७७ विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये मिळालेले गुण, आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत.
नेट कॅफे आणि इंटरनेटची सुविधा असलेल्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने शनिवारी आणि रविवारी सुटी असतानाही विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारपर्यंत राज्यातील एकूण २३३५३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
२०९३३१ जणांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. २००१७३ जणांनी शुल्क, तर १८४१४८ जणांनी विकल्प भरले आहेत. तक्रार निवारणाची प्रक्रियाही सुरू झाली आहे.रविवारपर्यंतची अर्जांची आकडेवारी दृष्टिक्षेपात
- कला (इंग्रजी) : २१
- कला (मराठी) : २३४
- वाणिज्य (मराठी) : ४६५
- वाणिज्य (इंग्रजी) : ३७३
- विज्ञान : ११८४
- एकूण : २२७७