कोल्हापूर : या देशातील शेतकरी हा एकच घटक असा आहे की, त्याने ठरविले तर २०१९ च्या निवडणुकीत तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करू शकतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी तेलंगण राज्यातील खम्मम जिल्ह्यात केले.राष्ट्रीय किसान मुक्ती यात्रेच्या दुस-या टप्प्यास तेलंगण राज्याच्या विधानभवनापासून सुरुवात झाली असून, ही यात्रा तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यात पोहोचली आहे. या किसान यात्रेचे येथील शेतक-यांनी जोरदार स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, ‘देशातील शेतक-यांना अच्छे दिन आणून स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दिले होते.मात्र, त्या आश्वासनाचा नरेंद्र मोदी यांना विसर पडला असून, सरकारच्या धोरणामुळे देशातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे देशातील शेतक-याला संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. त्यासाठीच ही यात्रा काढण्यात येत असून केंद्रातील भाजप सरकारला या प्रश्नांवर आम्ही नक्कीच गुडघे टेकायला लावू.’किसान मुक्ती यात्रा खम्मम जिल्ह्यामधे पोहोचली तेव्हा स्टेडियममध्ये हजारो शेतकरी जमले होते.यावेळी व्ही. एम. सिंह (उत्तर प्रदेश), योगेंद्र यादव (हरियाणा), डॉक्टर सुनीलम्म (मध्य प्रदेश), कविता (कर्नाटक), चंद्रशेखर रेड्डी (तेलंगणा), आदी शेतकरी नेते उपस्थित होते.
किसान मुक्ती यात्रेच्या दुस-या टप्प्यास सुरवात; मोदींचा पराभव करण्याची ताकद फक्त शेतक-यांतच - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 2:20 AM