कोल्हापूर : लक्ष्मीविलास पॅलेस सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू असून ते लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे होते. त्यांचे विचार आणि कार्य केवळ देशालाच नव्हे तर जगालाही प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थित होते.यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, नगरसेवक अशोक जाधव, संदीप नेजदार, माधुरी लाड, स्वाती यवलुजे उपस्थित होत्या.