कोल्हापूर : कसबा बावडा, कोल्हापूर येथील वृध्देचा १४ दिवसांनंतरचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. ६ एप्रिल रोजी या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.या वृध्देचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याआधी सलग १0 दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकही रूग्ण पॉझिटिव्ह आला नव्हता. मात्र सातारा जिल्ह्यात नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कसबा बावडा येथील मराठा कॉलनीतील या वृध्देचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती.
आधीच त्यांना जुना आजार असल्याने आरोग्य विभागही सुरूवातीला चिंतेत होता. त्यामुळे सीपीआरच्या कोरोना विशेष कक्षामध्ये या वृध्देवर उपचार सुरू होते. या उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यानंतर या वृध्देचे १४ दिवसांनंतरचे कोरोनाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या कोरोना मुक्त मानल्या जातात. जिल्ह्यातील १0 पैकी ३ रूग्ण हे आता कोरोनामुक्त ठरले आहेत.