चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : देशातील साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने निर्यातीचा दुसरा कोटा जाहीर होण्याची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या ६० लाख टन निर्यात कोट्याचे करार महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले आहेत. यातील ३७ लाख ७५ हजार टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे.अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे यंदा देशातील उसाच्या वजनात घट होऊन साखरेचे उत्पादनही घटले आहे. परिणामी साखरेचे देशातील उत्पादन ३३५ लाख टनाच्या आसपास राहील असा अंदाज आहे. इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या ४५ लाख टन साखरेचा यात समावेश नाही. देशाची साखरेची गरज, प्रत्यक्षातील निर्यात पाहता पुढील हंगामाच्या सुरुवातीला ६० ते ६५ लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. जी नव्या हंगामातील पहिल्या अडीच तीन महिन्यांची गरज भागविण्यासाठी आवश्यक असते. हंगामातील उत्पादनाचा अंदाज घेऊन आणखी १० लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी दिली जाऊ शकते असे संकेत सरकारी सूत्रांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात साखर उत्पादनाचे येणारे आकडे पाहता ही शक्यता आता धूसर झाली आहे.निर्यातीचा विचार करता ९ मार्चपर्यंत ४३ लाख ९० हजार टन साखर निर्यातासाठी बाहेर पडली आहे. यातील ३७ लाख ७५ हजार टनांची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. उर्वरित १२ लाख ७५ हजार टन साखर जहाजात किंवा प्रवासात आहे असे ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीआंतरराष्ट्रीय बाजारात सध्या ४२ ते ४५ रुपयांच्या दरम्यान साखरेचे दर आहेत. केंद्र सरकार निर्यातीचा आणखी एक कोटा जाहीर करेल आणि वाढलेल्या दराचा फायदा आपल्याला मिळू शकेल असे साखर कारखानदारांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदरी निराशाच येणार आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक घटमहाराष्ट्रात इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या साखरेसह १५० लाख टन उत्पादन होईल असा अंदाज हंगामाच्या सुरुवातीला वर्तविला गेला होता; मात्र उसाच्या वजनातील घट आणि साखर उताऱ्यातील घट पाहता हे उत्पादन आता ११५ लाख टनापर्यंतच राहील असा अंदाज आहे.
साखर निर्यातीचा दुसरा कोटा जाहीर होण्याची शक्यता दिसत नसली तरी देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या दरात थोडीफार वाढ होऊ शकते. -विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ