कोल्हापूर : फुललेल्या सुखी संसारात पत्नीने वाढदिवसाला पतीला प्रेमाची निशाणी म्हणून किमती भेटवस्तू दिल्या. नियतीला कदाचित हे मान्य नव्हते. दीर्घ आजाराने पत्नीचे निधन झाले. तिने दिलेल्या प्रेमाच्या भेटवस्तूंच्या आठवणींवर पती आपल्या दोन मुलांसह आपले आयुष्य जगू लागला आणि एका रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी करून आठवणीतला तो प्रेमाचा खजिना लंपास केला. बहरलेल्या संसारात दोघांनी लिहिलेली प्रेमपत्रेही चोरट्यांनी फाडून टाकली. हवालदिल झालेल्या पतीने अखेर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दि. १० मे रोजी तक्रार दिली.
मूळचे दिल्लीचे मनोजकुमार श्रीवास्तव (वय ४९) कोल्हापुरातील एका खासगी कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. ते मुलगी निधी (२४), मुलगा अभिषेक (२१) यांच्यासह मुक्त सैनिक वसाहत येथील रंजना रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात. लग्नानंतर पत्नी सक्ता यांनी मनोजकुमार यांना वाढदिवसाला किमती घड्याळ, लॉकेट, चेन, मोबाईल अशा भेटवस्तू दिल्या होत्या. सक्ता अंबाबाईची रोज पूजा करीत असल्याने मनोजकुमार यांनी त्यांना अंबाबाईची सोन्याची मूर्ती भेट म्हणून दिली होती. तसेच चांदीच्या देवाच्या मूर्तीही दिल्या होत्या. सुखी संसारात श्रीवास्तव कुटुंबीय न्हाऊन गेले होते.
मात्र, २०१२ मध्ये सक्ता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आणि श्रीवास्तव कुटुंब आई-पत्नीविना पोरके झाले. मनोजकुमार आपल्या दोन मुलांसह राहू लागले. पत्नीने दिलेल्या भेटवस्तूंच्या आठवणींत ते आणि त्यांची मुले जगू लागली. दि. ८ मे रोजी ते कुटुंबासह गुडगाव-दिल्ली येथे गेले होते. १० मे रोजी पहाटे घरी आले असता मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. आतमध्ये पाहिले असता बेडरूममधील तिजोरीचा दरवाजा उघडला होता. त्यातील सगळे साहित्य विस्कटले होते. चोरट्यांनी २२ हजार रोकडीसह पत्नीच्या मौल्यवान भेटवस्तूही चोरून नेल्याचे दिसले. पैसे गेल्याचे दु:ख त्यांना नाही; परंतु पत्नीच्या वस्तू चोरीला गेल्याने ते सैरभैर झाले. आपल्या प्रेमाची निशाणी मिळावी म्हणून त्यांनी चोरट्यांनाच भावनिक आवाहन केले आहे. माझ्या वस्तू परत करा, तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. चोरी केलेल्या प्रेमाच्या निशाणीच्या भेटवस्तू शाहूपुरी पोलीस शोधून देतील का? असा प्रश्न श्रीवास्तव कुटुंबीयांना पडला आहे.चोवीस तास सुरक्षामुक्त सैनिक वसाहतीमधील रंजना रेसिडेन्सी अपार्टमेंटला २४ तास सुरक्षारक्षक आहे. इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. घरफोडी झाली त्याच दिवशी हे कॅमेरे बंद होते. सुरक्षारक्षक असतानाही चोरी होते, कॅमेरे काहीवेळ बंद होतात; त्यामुळे घरफोडी करणारा जवळचा माहितीतील असण्याची शंका स्थानिक नागरिकांना आहे.
मुक्त सैनिक वसाहतीमधील घरफोडीची नोंद झाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेत आहोत.- संजय मोरे, निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे