कोल्हापूर : वसंतराव चौगुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या दत्तात्रय जाधव (वय ५५, रा. विचारेमाळ) यांच्या आत्महत्येप्रकरणी शाहूपुरी पोलीस कसोशीने तपास करत आहेत. आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम. एस. पाटोळे यांच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची फिर्याद दत्तात्रय जाधव यांनी दिल्याने पाटोळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये पाटोळे यांनी नातेवाईक लिपिकाला वाचविण्यासाठी जाधव यांना दंड भरण्यासाठी तगादा लावल्याचे समजत आहे. दरम्यान, संस्था की घरगुती वाद, या दोन्ही बाजूंनी पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती तपास अधिकारी अमृत मराठे यांनी दिली. शाहूपुरी व्यापारपेठेतील आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वसंतराव चौगुले विद्यालयाच्या दुसर्या मजल्यावरील वर्गात विद्या जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, दत्तात्रय जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम संस्थेने बँकेतच ठेवली. ती आयकर खात्याकडे वर्ग करणे आवश्यक होते. ती रक्कम वर्ग न केल्यामुळे आयकर विभागाने १ लाख ३२ हजार रुपये दंड केला. ही रक्कम विद्या जाधव यांनी स्वत:च्या पगारातून भरावी, असा तगादा सचिव पाटोळे यांनी लावल्यामुळेच पत्नीने आत्महत्या केल्याचा आरोप दत्तात्रय जाधव यांनी केला आहे. या प्रकरणी आज दिवसभर पोलिसांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे जाबजबाब घेतले. त्यामधून आयकर विभागाने केलेला दंड हा २०१३ मधील आहे. परंतु दंडाची रक्कम संस्था भरणार असल्याचा ठराव दोन दिवसांपूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत झाला असल्याचे संस्था कार्याध्यक्ष बाबुराव मुळीक यांनी सांगितले आहे. त्यामुळे आत्महत्येपाठीमागे काही घरगुती कारण असू शकते का? याचाही पोलीस अंदाज घेत आहेत. दोन्ही बाजूंनी तपास सुरू असून लवकरच यामागचे मूळ कारण स्पष्ट होईल, असे सहायक पोलीस निरीक्षक मराठे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे चौकशीच्या फेर्यात मुख्याध्यापिका जाधव आत्महत्या प्रकरण : नातेवाईक लिपिकाची पाठराखण अंगलट येण्याची शक्यता
By admin | Published: May 09, 2014 12:36 AM