कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंदिरांच्या परिसरात येऊन कळसाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी चोख बंदोबस्त नेमला आहे. सुमारे २०० पोलीस व ५० गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक केली आहे.नवरात्रौत्सवाच्या काळात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच तेल घालण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. दरवर्षी किमान आठ ते दहा लाख भाविक कोल्हापुरात येत असतात.
कोरोनामुळे यंदा मंदिर बंद ठेवले आहे. तरीही दुरूनच कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानणारे भाविक कोल्हापुरात येण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला आहे. त्र्यंबोली मंदिर, वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिर व शहरातील जागृत महादेव मंदिराच्या ठिकाणीही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.नवरात्रौत्सव काळात शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण विभागानेही चोख नियोजन केले आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख चौकात, गर्दीच्या ठिकाणी जादा कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, चक्का जाम होऊ नये याकडे कटाक्षाने पाहिले जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले आहे.