विश्र्वास पाटील कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी त्यामागे जिल्हा परिषद सदस्य असलेला त्यांचा मुलगा राहुल यांचाच दबाव जास्त होता. त्यातूनच हा निर्णय झाल्याचे पुढे आले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून धैर्यशील माने हे विजयी झाल्यापासूनच आवाडे गटात जास्त अस्वस्थता होती. त्याचीच परिणती पक्ष सोडण्यात झाली आहे. आवाडे गटाच्या राजकारणात राहुल यांचा शब्द आता कोण डावलू शकत नाही, हेच त्यामागील खरे कारण आहे.लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढायचे कुणी हे ठरत नव्हते. त्यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून धैर्यशील माने, निवेदिता माने, आदी विविध नावांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी राहुल आवाडे यांचा शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न होता.
मी शिवसेनेत जाऊन शेट्टी यांच्याविरोधात लढतो, असा त्यांचा कुटुंबातही टोकाचा आग्रह होता. त्यांनी शेट्टी यांच्याविरोधात त्यावेळी अर्जही दाखल केला होता. त्यावेळी त्यांचा अर्ज माघार घेताना आवाडे कुटुंबीयांना नाकीनऊ आले होते; परंतु त्याच्या काही दिवसच आधी प्रकाश आवाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती आणि आवाडे घराण्याचे काँग्रेसशी इतक्या वर्षांचे संबंध आहेत. शिवाय त्यांचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शेट्टी यांच्याशीही चांगले संबंध तयार झाले होते. त्यामुळे कुटुंबातूनच राहुल यांना पाठबळ मिळाले नाही.
पुढच्या राजकारणात धैर्यशील माने यांना ही संधी मिळाली व ते लाटेवर स्वार होऊन खासदार बनले. त्यानंतर मात्र राहुल यांची चिडचिड जास्त वाढली. ‘तुमच्यामुळेच माझा खासदारकीचा हातातोंडाचा घास गेला,’ असे राहुल यांचे म्हणणे होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांचा वडिलांवर काँग्रेस सोडण्याचा दबाव होता. तो लोकसभेला नाही, परंतु किमान विधानसभेच्या अगोदर तरी यशस्वी झाला.आवाडे नकोत की हात?राहुल यांनीच गेल्या महिन्यात इचलकरंजीत तीन टीम नेमून घरोघरी सर्वेक्षण करून घेतले होते. त्यामध्ये ‘आम्हांला आवाडे हवेत; परंतु तुमचे हात चिन्ह नको अशी बहुतांश लोकांनी सांगितल्याचे आवाडे यांचे म्हणणे होते.
नव्या पिढीला हात चिन्हावर मते द्यायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही हे चिन्ह घेऊ नका, असा निर्णय झाला. चिन्ह घ्यायचे नाही तर पक्षात राहून अपक्ष म्हणून लढता येणार नाही म्हणून त्यांनी शेवटी काँग्रेसलाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजीला आवाडे नकोत की हात नको याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे.