सागर चरापले
कोल्हापूर : शहरात पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, पण त्याचा परिणाम तलावाशेजारी असणाऱ्या मत्स्यबीज केंद्राला बसला आहे. त्यात सोडण्यात आलेल्या १९ लाख मस्य जिरे (बीज) रंकाळा तलावात वाहून गेले, परिणामी जिल्ह्यातील मत्स्यशेती करणारे शेतकरी, लहान-मोठे तलाव यांना मत्स्यबीजाचा तुटवडा जाणवणार आहे. जिल्ह्यातील लहान-मोठे तलाव यांना प्रतिवर्षी रंकाळा मत्स्यबीज केंद्रातून बीज पुरवठा केला जातो. तसेच जवळपास १२५ शेततळीच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही इथूनच बीजपुरवठा केला जात होता. यंदा बीजच वाहून गेल्याने शेतकऱ्यांसह लहान-मोठ्या तलावांना मत्स्यबीज तुटवडा भासणार आहे. याचा परिणाम शेतकरी, कोळी, मत्स्यव्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचणार आहे.
.. यंदाच बीजी निर्मितीचा प्रयत्न
मत्स्यव्यवसाय विभागाकडून गेल्या सहा वर्षांपासून रंकाळा मत्स्यबीज केंद्रातून बीज निर्मिती प्रक्रिया बंद होती. खासगी मत्स्यबीज विक्रेत्याकडून जिल्ह्यातील तलाव व शेतकऱ्यांना बीज पुरवठ्यासाठी मदत केली जात होती. यंदा नव्याने रंकाळा मत्स्यबीज केंद्रात बीज निर्मितीचा प्रयत्न केला होता. पण पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, परिणामी ६ बीज प्रक्रिया तळी (लगून) मध्ये पाणी साम डोम भरल्याने जवळपास सर्वच बीज रंकाळा तलावामध्ये वाहून गेले.
चौकट : मत्स्यव्यवसाय विभाग २००८ पासून प्रभारी...
विभागीय मत्स्यव्यवसाय विभागामध्ये विभागीय आयुक्त हे पद २००८ पासून प्रभारी आहे. तसेच या विभागातील प्रत्यक्ष रंकाळा मत्स्य केंद्रामध्ये काम करणारे क्षेत्रीकची ३ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मत्स्य व्यवसायाकडे कल वाढत चाललेला असतानासुद्धा येथे कायमस्वरूपी विभागीय आयुक्त व इतर रिक्त पदे भरण्याची गरज होती, पण शासनाच्या अनास्थेमुळे या विभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कोट: प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात खासगी किंवा सरकारी बीज उपलब्ध होत होते. यावर्षी पुराने बीज वाहून गेल्याने खासगी विक्रेत्याकडून चढ्या दराने बीज विकत घ्यावे लागणार आहे. महापुराने इतर पिके वाया गेली आहेतच शिवाय मत्स्य शेती तोट्यात येणार आहे. आनंदा पाटील, कोथळी (ता. करवीर) मत्स्य शेतकरी.
कोट: यावर्षी रंकाळा तलाव पूर्ण भरल्याने शेजारील मत्स्य तळ्यातील बीज तलावात वाहून गेले आहे. जिल्ह्यातील तलाव व शेतकऱ्यांना इतर शासकीय किंवा खासगी बीज उपलब्धतेसाठी मार्गदर्शन केले जाईल. सतीश खाडे, प्रभारी सहायक आयुक्त मत्स्य विभाग.