कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड, रंकाळा तलाव पाहून देशभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) शिबिरार्थी भारावून गेले. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिर सुरू आहे.या राष्ट्रीय शिबिराचा शनिवार (दि. १५) पासून प्रारंभ झाला. त्यासहभागी शिबिरार्थींनी पन्हाळगडाला भेट दिली. तेथील तीन दरवाजा, पुसाटी बुरूज, धान्य कोठार, तबक उद्यान पाहून ते भारावले. विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राला त्यांनी भेट देऊन, तेथील कामकाजाची माहिती घेतली. यानंतर दुपारी अंबाबाई मंदिर, भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सायंकाळी रंकाळा तलाव गाठला. ही मंदिरे आणि तलाव परिसर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रबद्ध केला.
काहीजणांनी मंदिर आणि तलावाची माहिती जाणून घेतली. रात्री या शिबिरार्थींना विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापनावरील लघुपट दाखविण्यात आला.
यावेळी ‘एनएसएस’चे डी. कार्तिकेयन, डी. के. गायकवाड, अजय शिंदे, डी. नायक, आदी उपस्थित होते. या शिबिरात युवा नेतृत्व, लघुपट निर्मिती या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून एनएसएसच्या शिबिरात मी सहभागी होत आहे. त्यातून देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी सहभागी होत असल्याने आम्हाला एकमेकांची संस्कृती समजून घेता येत आहे.- अल्मास खान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
या शिबिरात सहभागी होण्याचे माझे यंदाचे तिसरे वर्ष आहे. युवा पिढीमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण करण्यासाठी एनएसएसचे शिबिर उपयुक्त ठरत आहे. या शिबिरात क्रीडा स्पर्धांचा समावेश करावा.- अंजली दीक्षित, एस. एस. जैन सुबोध पी. जी. कॉलेज, राजस्थान
देशात ४० लाख, तर महाराष्ट्रात ३ लाख ३० हजार इतके एनएसएसचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्या श्रमदानातून वर्षाला अनेक कामे होतात. विद्यार्थ्यांमधील ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा. त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक भावना रूजविण्यासाठी राष्ट्रीय शिबिर घेण्यात येत आहे.- अजय शिंदे, युवा सहयोगी, एनएसएस.