कोल्हापूर : देवकर पाणंद परिसरातील शाळकरी मुलगा दर्शन शहा खून खटल्याच्या सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी महत्त्वाच्या तिघा साक्षीदारांच्या सरकार पक्षातर्फे साक्षी तपासण्यात आल्या. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर साक्षीदार सागर सदाशिव चौगुले यांनी २५ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयित आरोपी चारू चांदणे हा दर्शनला राऊत यांच्या उसाच्या शेताकडे घेऊन जाताना मी पाहिले आहे, अशी साक्ष दिली. ही साक्ष सरकार पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. तीन दिवस ही सुनावणी संवेदनशील वातावरणात पार पडली. पुढील सुनावणी ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर अशी तीन दिवस चालणार आहे. यावेळी आणखी काही साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या जाणार आहेत. दर्शन शहा खून खटल्याच्या सुनावणीला न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दर्शनची आई स्मिता रोहित शहा, त्याचा मित्र आदित्य आनंदा डावरे आणि शेजारी राहणाऱ्या सुनंदा सदाशिव कुलकर्णी यांच्या साक्षी तपासल्या. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये दर्शनला संशयित आरोपी चारू चांदणे घेऊन जाताना पाहिलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सागर चौगुले, लखोटा व चिठ्ठी पाहून दर्शनच्या आईला फोन करून बोलावून घेतलेले साक्षीदार विश्वजित मोहन बकरे व पंच साक्षीदार अशोक श्रीपती पाटील यांच्या साक्षी तपासण्यात आल्या. या तिघांनाही दर्शनचे कपडे दाखविण्यात आले. ते त्यांनी ओळखले. यावेळी आरोपीचे वकील पीटर बारदेस्कर यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेत साक्षीदार सांगत असलेली माहिती खोटी आहे, असा आरोप केला. हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. यावेळी तपास अधिकारी यशवंत केडगे, दर्शनचे नातेवाईक, साक्षीदार, सुश्रुषानगर येथील नागरिक उपस्थित होते.
चांदणे हा दर्शनला घेऊन जाताना पाहिले
By admin | Published: August 05, 2016 1:29 AM