कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) सभेत विरोधक घुसल्यावर आत असलेल्या सभासद, कार्यकर्ते व पत्रकारांच्या छातीतही धस्स झाले. पुढे काय होणार या भीतीने मनात काहूर उठले. शिवीगाळ व चप्पलफेक सुरू होती; परंतु तरीही दोन्ही बाजूने संयम बाळगल्याने अनुचित प्रकार घडला नाही.विरोधी गटाचे नेते व सभासदही गोकुळ संघाच्या गेटसमोर समांतर सभा घेत आहेत; त्यामुळे ते आत येणार नाहीत, कारण आत त्यांच्या सभासदांना बसायलाच जागा नाही, अशी हवा सभामंडपात होती; त्यामुळे सत्तारूढ गटाचे नेते व सभासदही तसे निवांत होते; परंतु बघता बघता वातावरण बदलले आणि ११ च्या सुमारास विरोधक, संघाच्या सभामंडपात घुसल्याने सभेतील चित्रच बदलले. पोलिसांनी त्यांना मंडपाच्या मध्यावर अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. एवढा प्रचंड तणाव होता, की कोणत्याही क्षणी काहीही घडू शकले असते. तिथे परिस्थिती अशी होती, की दोन्ही बाजूला कार्यालयाच्या भिंती. सभामंडप अरुंद जागेत होता. पुढील बाजूस लोखंडी बॅरेकेटस व मागील बाजूसही पळायला फारशी जागा नाही. सभामंडपात सभासद मांडी घालून बसलेले होते. चप्पल फेकाफेकी पाहून वातावरण चांगलेच तापले; त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी नुसती काठी जरी उगारली असती, तरी पळापळ होऊन चेंगराचेंगरीत लोकांचे बरेवाईट झाले असते; परंतु पोलिसांनीही संयम बाळगला. चप्पल-बूट, चिवड्याच्या पिशव्या वरून अंगावर पडत असतानाही विरोधी गटांच्या समर्थकांनी त्यास फारसे प्रत्युत्तर दिले नाही व मंडपातून ते निघून गेल्याने अघटित घडले नाही.ही सभा जागा अपुरी असल्याने अन्यत्र घ्यावी, अशी विरोधकांची मागणी होती; परंतु नेहमीच्या पद्धतीने सभा घेऊन ठराव मंजूर करण्याची सत्तारूढ आघाडीला घाई असल्याने त्यांनी सभा तिथेच घेण्याचा आग्रह धरला. दोन्ही बाजूने झालेले आरोप-प्रत्यारोप, त्यामुळे वाढलेला तणाव याचा पोलिसांवरही ताण होता.
विरोधक आल्याचे पाहून छातीत धस्स झाले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 1:08 AM