कोल्हापूर : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर तारीख लागण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या राज्य अधिवेशनासाठी पवार कोल्हापुरात आले. यावेळी पंचशील हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी गुरुवारी रात्री विविध संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.बेळगाव येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीची सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेली याचिका बोर्डावर येण्यासाठी पाठपुरावा करावा. महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांच्याशी तातडीने बैठक घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली.
यावर शरद पवार म्हणाले,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची वेळ घेऊन सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नासाठीचे तारीख घेतली जाईल. दरम्यान, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली जाईल. या संदर्भात समिती १६ फेब्रुवारी रोजी पवार यांची भेट घेणार आहे. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, विजय पाटील, सुनील आनंदाचे, महेश जुवेकर, प्रकाश पाटील उपस्थित होते.भेटण्यासाठी उशिरापर्यंत प्रतीक्षाशरद पवार यांना मिरजेतील कार्यक्रम आटोपून कोल्हापुरात येण्यासाठी उशीर झाला. यामुळे ते थेट तपोवन येथील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या राज्य अधिवेशनाकडे गेले. यानंतर रेसिडेन्सी क्लब येथे कार्यकर्त्यांसोबत भोजन करण्यासाठी गेले. साडेनऊच्या सुमारास ते पंचशील हॉटेलमध्ये आले.
तोपर्यंत एकीकरण समितीसह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते थांबून होते. यावेळी भूविकास बँकेचे कर्मचारी, संजीव सहकारी औद्योगिक संस्था, प्रहार दिव्यांगांच्या संघटना, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)च्या वतीने शिष्टमंडळ, भटके विमुक्त जमाती विचारमंचचे व्यंकाप्पा भोसले तसेच कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.