कोल्हापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्त्याकडेला असणारी बेवारस वाहने जप्तीची कारवाई आज, शुक्रवारपासून सुरु करण्यात येत आहे. पोलीस व महानगरपालिका यांच्यावतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
फूटपाथवरील अतिक्रमणे हटविणे, बंद सिग्नल सुरु करणे याही गोष्टीवर बैठकीत चर्चा झाली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत चार दिवसांपूर्वीच बैठक झाली होती. बैठकीमध्ये रस्त्याकडेची बेवारस वाहने हटविणे, रिक्षा थांब्यांचे स्थलांतर, नवे ११ सिग्नल कार्यान्वित करणे, फूटपाथवरील अतिक्रमणे हटविणे, आराम बसेसना शहराबाहेर वाहनतळ उपलब्ध करुन देणे, अवजड वाहनांना दिवसा शहरबंदी, दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, पट्टे आखणी याबाबत सूचना केल्या होत्या. या सर्व विषयांवर गुरुवारी सविस्तर चर्चा झाली.