कोल्हापूर : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने सोमवारी (दि. २९) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.कोल्हापूर शहरातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी वर्गातील प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यातील दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार दुसऱ्या फेरीची निवड यादी शनिवारी घोषित केली जाणार होती. मात्र, या फेरीमध्ये १४० विद्यार्थ्यांनी नव्याने आपल्या अर्जामध्ये बदल केला; पण त्याची मूळ प्रत (हार्ड कॉपी) केंद्रीय समिती, मुख्य केंद्रावर जमा केली नाही.
अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज संगणक प्रणालीमध्ये घेणे गरजेचे होते. वाणिज्य शाखेत (इंग्रजी माध्यमामध्ये) प्रवेश क्षमतेपेक्षा २८० जादा विद्यार्थी आल्याने त्या सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय अॅलॉट करणे गरजेचे आहे.
तांंत्रिक बाबींमुळे संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त वेळ लागणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचना फलकावर सोमवारी (दि. २९) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
प्रवेशाचे वेळापत्रक
- निवड यादी प्रसिद्ध करणे : सोमवार (दि. २९).
- निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : सोमवार ते बुधवार (दि. ३१).
- जर जागा शिल्लक असतील तर एटीकेटीधारकांना दि. १ आॅगस्टनंतर प्रवेश दिले जातील.
दुसरी फेरी ही अंतिम फेरी असेल. त्याद्वारे अॅलॉट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने केला जाणार नाही.- सुभाष चौगुले, सचिव, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती.