अनिल पाटील सरुड : शाहूवाडी तालुका हा दुर्गम व डोंगराळ म्हणून ओळखला जात असला तरी येथील मुलांसह मुलीनीही आपल्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रात अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. स्पर्धा परिक्षा असो, सैन्य भरती असो अथवा पोलिस भरती असो या तिन्ही क्षेत्रात या तालुक्यातील मुलांसह, मुलींनीही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत शाहूवाडी तालुक्याच्या शिरपेचात नेहमीच मानाचा तुरा खोवला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिस भरतीमध्ये तालुक्यातील तब्बल १२ मुलींनी यश संपादन करत खाकी वर्दीचे आपले स्वप्न साकार केले आहे.शाहूवाडी तालुक्यातील प्राजक्ता संजय पाटील (सावे), कोमल नथुराम लाळे (कडवे पैकी लाळेवाडी), स्वाती शामराव पाटील (आरुळ), प्रतिक्षा देवानंद न्यारे, प्राजक्ता देवानंद न्यारे (दोघी शिरगाव), पुजा संपत कदम (अमेणी), दिपाली आनंदा पिपंळे, सोनाली हणमा पिंपळे (दोघी परखंदळे पैकी पिंपळेवाडी), प्रतिक्षा भगवान बजागे, रविना ज्ञानदेव बजागे (दोघी बजागेवाडी), उषा एकनाथ डफडे (पेगूचा धनगरवाडा), अवंतिका ज्ञानदेव चौगुले (गोगवे) या १२ रणरागिणीनी मुंबई पोलिस भरतीत बाजी मारली.सर्व मुली सर्वसामान्य कुटुंबातीलया सर्व मुली डोंगर कपारीतील गावामधील व सर्वसामान्य शेतकरी कुंटुंबातील आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द व परिश्रमाच्या जोरावर या सर्व मुलींनी मिळवलेले यश हे खरोखरच ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी तसेच मुलांसाठीही प्रेरणादायी आहे.सख्या बहिणींच यश शिरगाव येथील प्रतिक्षा देवानंद न्यारे व प्राजक्ता देवानंद न्यारे या दोन सख्या बहिणींनी एकाच वेळी मुबई पोलिस भरतीमध्ये यश संपादन केले आहे.
खाकी वर्दींचे पहिल्या पासुन आकर्षण होत. आई वडिलांचे शेतीतील कष्ट लहानपणा पासुन अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्या कष्टाला, मेहनतीला समाधानाची फुंकर मिळावी यासाठी शिक्षण घेत पोलिस भरतीसाठी जिद्दीने सराव केला व यश मिळवले. - प्राजक्ता पाटील, सावे