कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची निवड प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. या पदासाठी यथोचित व्यक्तीची शिफारस करण्यासाठी कुलपतींनी त्रिसदस्यीय शोध समिती तयार केली आहे. या समितीतर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्याची मुदत दि. २ जुलैपर्यंत आहे. निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मनुष्यबळ संचालनालयातील अतिरिक्त संचालक आर. के. जैन (सायंटिस्ट एफ) यांची नियुक्ती केली आहे. मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची मुदत दि. १७ जूनला संपणार आहे.राज्य शासनाच्या दि. २७ मे २००९ च्या राजपत्रानुसार कुलगुरूंच्या पदासाठी विहित केलेली अर्हता, अनुभव या अटींची पूर्तता करणाऱ्या तसेच हे आव्हानात्मक काम करण्यास इच्छुक असलेल्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी आवश्यक अर्हता, अनुभव, इष्टतम अनुभव आणि कौशल्ये, नैपुण्याबाबतच्या माहितीचा नमुना शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज विहित नमुन्यात चार प्रतींत आणि त्याचसोबत संगणकीकृत प्रत संपर्क अधिकारी यांच्या ई-मेल वर आणि अतिरिक्त संचालक, केंद्रीय मनुष्यबळ संचालनालय, खोली क्रमांक २४८, डीआरडीओ भवन, नवी दिल्ली-११००११ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन या शोध समितीने केले आहे.
ही माहिती सादर करावी लागणारइच्छुकांनी त्यांची वैयक्तिक माहिती, विहित नमुन्यात उमेदवारीबाबतचे दोन पानी समर्थन, विद्यापीठाकरिता दोन पानी भविष्यलक्षी योजना, कार्याची नीट ओळख असलेल्या तीन नामांकित व्यक्तींची नावे, संपर्क ही माहिती अर्जांसमवेत सादर करावयाची आहे.