कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा सुचविण्याचे आवाहन कोल्हापूर स्टार्टअप् मिशनने केले होते. त्याला प्रतिसाद देत देशभरातील ६२२ स्टार्ट अप् कंपन्यांनी तयारी दर्शविली. त्यातील सहा नावीन्यपूर्ण कल्पनांची (स्टार्टअप् कंपनी) प्रत्यक्ष कामासाठी निवड केली आहे. त्यामध्ये अक्वाफ्रंट इन्फ्रा (कानपूर), रिव्हरबिन, क्रेडोस इन्फ्रा (पुणे), रेस्पिरेर लिविंग सायन्स (मुंबई), समुद्योग वेस्ट चक्र (चेन्नई), इको-ग्रीन इंडिया (कोल्हापूर) यांचा समावेश आहे. त्यांना कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर, डी. वाय. पाटील ग्रुपकडून आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या (एनएसटीइडीबी) प्रमुख डॉ. अनिता गुप्ता, आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, एसआयआयसी आयआयटी कानपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. निखिल अग्रवाल, महाराष्ट्र राज्य इनोवेशन सोसायटीचे नोडल अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत या सहा विजेत्यांची निवड घोषित करण्यात आली.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, डी. वाय. पाटील ग्रुप, आयआयटी कानपूरच्या स्टार्ट अप् इंक्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर यांचा संयुक्त उपक्रम असलेले कोल्हापूर स्टार्ट अप् मिशन दि. १५ जानेवारी रोजी सुरू झाले. पाणीपुरवठा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, हवेतील शुद्धता राखण्याचे नियोजन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, इ-प्रशासन, कृषी व्यवस्थापन आणि वाहतूक या विषयांवर तोडगा काढणाऱ्या नवसंकल्पनांसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यात ६२२ ‘स्टार्टअप्’चे अर्ज दाखल झाले. त्यातील १२७ स्टार्टअप् हे कोल्हापुरातील होते. १३३ स्टार्टअप् हे पात्रतेच्या निकषांवर दुसऱ्या फेरीसाठी निवडले. त्यातून अंतिम सादरीकरणासाठी तज्ज्ञांनी १५ स्टार्टअप्ची निवड केली. अंतिम सादरीकरण मंगळवारी झाले. त्यामधून सहा सर्वोत्तम नावीन्यपूर्ण नवसंकल्पना निवडण्यात आल्या. या निवडीसाठी असलेल्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये प्रा. अमिताभ बंडोपाध्याय, डॉ. सी. डी. लोखंडे, अभिजित माने, जयशंकर शर्मा, अदिती कुमार यांचा समावेश होता.
चौकट
या नवसंकल्पनांना सर्व मदत देणार
कोल्हापूर स्टार्ट अप् मिशनच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला. आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या माध्यमातून या स्टार्ट अप् कंपन्यांच्या नवसंकल्पनांना कोल्हापूरमध्ये सर्व प्रकारची प्रशासकीय, स्थानिक मदत दिली जाईल. हा उपक्रम देशातील नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून नक्की नावारूपाला येईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
फोटो (०३०३२०२१-कोल-कोल्हापूर स्टार्टअप ०१) : कोल्हापूरच्या नागरी समस्यांवर तोडगा सुचविण्यासाठी सहा स्टार्टअप् विजेत्यांची घोषणा मंगळवारी आमदार ऋतुराज पाटील, ‘एनएसटीइडीबी’च्या प्रमुख डॉ. अनिता गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आयआयटी कानपूरचे सीईओ डॉ. निखिल अग्रवाल, राज्य इनोवेशन सोसायटीचे नोडल अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत झाली.
फोटो (०३०३२०२१-कोल-कोल्हापूर स्टार्टअप ०२)