कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील विविध मराठा संघटनांनी गुरुवारी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी ‘आत्मक्लेश’ आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मराठा समाजाला लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.
इतर समाजाची व्होट बँक सांभाळण्यासाठी राज्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण नाकारत आहेत. ते आता मराठा समाज खपवून घेणार नाही. कोरोनामुळे आम्ही आज शांततेत आत्मक्लेश आंदोलन केले. यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. आरक्षणाबाबतच्या खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असणार आहे, असे बाळ घाटगे यांनी सांगितले.
या आंदोलनात अखिल भारतीय छावा मराठा संघटना, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा आरक्षण संघर्ष समिती, लोकराजा राजर्षी शाहू प्रतिष्ठान, मराठा समाज सेवा संघटना, मराठा रियासत, मराठा समाज, विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या.
फोटो (०३०६२०२१- कोल- मराठा समाज आत्मक्लेश ०१ व ०२) : कोल्हापुरात गुरुवारी मराठा समाजातील विविध संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)