कोल्हापूर : पर्ल्स कंपनीच्या सील केलेल्या सर्र्व मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना एकरकमी पैसे द्यावेत, अशी मागणी गुंतवणूकदारांनी अखिल भारतीय पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेच्या मेळाव्यात शनिवारी करण्यात आली. त्याचबरोबर गुंतवणूकदारांच्या मुंबई येथे २ एप्रिलला होणाऱ्या मोर्चासाठी जिल्ह्यातून सुमारे एक हजार जण जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
शाहू स्मारक येथे पर्ल्स गुंतवणूकदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संघटनेचे सचिव शंकर पुजारी होते.शंकर पुजारी म्हणाले, ‘सेबी’ व निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या समितीने गुंतवणूकदारांची देणी भागविण्यासाठी आतापर्यंत पर्ल्स कंपनीच्या देशभरातील नऊ हजार कोटींच्या मालमत्ता विकल्याआहेत.
यातून कमीत कमी अडीच हजारांची गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदाराला प्राधान्यक्रमाने ही रक्कम दिली जाणार आहे; परंतु प्रत्यक्षात ही देणी ६० हजार कोटींची असून, पर्ल्सची एकूण मालमत्ता १ लाख ८५ हजार कोटी रुपयांची आहे. यामध्ये देशातील सहा कोटी, तर महाराष्टÑातील ७० लाखगुंतवणूकदार आहेत. सर्व मालमत्ता विकूनही तिप्पट पैसे शिल्लक राहू शकतात आणि उपलब्ध रकमेतून सर्व गुंतवणूकदारांना एकरकमी पैसे देणे शक्य आहे. त्यामुळे ‘सेबी’ व लोढा समितीने या पद्धतीने देणी भागवावीत.ते पुढे म्हणाले, गुंतवणूकदारांच्या मागण्यांसाठी २ एप्रिलला ११ वाजता मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘सेबी’च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे. सरकारची भूमिका गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची नाही, तर इतरांना ते लुटू देण्याचीआहे.या बैठकीत मुंबईला जिल्ह्यातून सुमारे एक हजार जण जाण्याचा निर्धार सर्वांनुमते व्यक्त करण्यात आला.विजय बचाटे यांनी प्रास्ताविक केले. सुमन पुजारी यांनी आभार मानले. यावेळी एस. एम. हंकाळी, अनिल म्हमाणे, केरबा शेटे, तुकाराम केर्लेकर, शिवाजी ढेकळे, ए. के. म्हालदार, गजानन व्हनमोरे यांच्यासह गुंतवणूकदार उपस्थित होते.