मिरज : कमळ व ट्युलिपसदृश आकर्षक फुलांची रोपे असल्याचे भासवून जलपर्णी व केंदाळ विक्री करणाऱ्या टोळीने मिरजेतील सुभाषनगरात नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. मंगळवारी केंदाळ विक्री करून फसवणूक करणाऱ्या एका महिलेस नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पावसाळा आल्याने फुलांची रोपे म्हणून जलपर्णी विक्री करणाऱ्या टोळ्या नागरिकांना फसवत आहेत. मिरजेतील सुभाषनगर येथे रिक्षातून जलपर्णी घेऊन आलेल्या चार महिलांनी मंगळवारी घरोघरी जाऊन कमळ व ट्यूलिपप्रमाणे आकर्षक फुलांची रोपे असल्याचे सांगितले. सोबत आणलेले फुलांचे फोटो दाखवून प्रत्येकी ५० रुपयाप्रमाणे रोपांची विक्री केली. आकर्षक फुलांचे फोटो पाहून शेकशे नागरिकांनी शंभर ते पाचशे रुपयापर्यंत रोपांची खरेदी केली. विशाल टोमके या जागरूक तरुणाने विक्री केलेली रोपे जलपर्णी असल्याचे ओळखले. विशाल याने फसवणुकीबाबत माहिती दिल्यानंतर नागरिकांनी रोपे विक्री करणाऱ्या दोन महिलांना पकडले. दोन महिलांनी पलायन केले. रिक्षातून पोलिस ठाण्यात नेताना एका महिलेने उडी मारून पलायन केले. साखरबाई माणिक पवार (वय ६०, रा. अमरावती) असे नाव सांगणाऱ्या वृद्ध महिलेस ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशाल टोमके यांनी याबाबत ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. मिरजेत ब्राह्मणपुरी दिंडीवेस पंढरपूर रस्त्यासह शहरातील अनेक उपनगरात जलपर्णी प्रजातीतील रोपांची विक्री करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या वृद्ध महिलेने बंधाऱ्यातील पाण्यात उगविणारी जलपर्णी आणून विक्री करीत असल्याची माहिती दिली. विक्री करण्यात आलेल्या या रोपांना कोणतीही फुले येत नाहीत. मातीत लावलेली ही रोपे काही दिवसात वाळून जातात. फुलांच्या रोपांच्या नावावर करण्यात येणाऱ्या फसवणुकीच्या या नव्या प्रकारामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. (वार्ताहर)
ट्युलिप भासवून केंदाळची विक्री
By admin | Published: June 15, 2016 12:25 AM