पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात मुद्रांक विके्रत्यांकडून चढ्या दराने मुद्रांकांची विक्री केली जात असल्याने तालुक्यातील जनतेची आर्थिक लबाडणूक सुरू आहे. त्यामुळे या मुद्रांक विक्रेत्यांकडून होणाºया त्रासाने सर्वसामान्य जनता हैराण झाल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.तालुक्यात कोडोली, कळे, पोर्ले, कोतोली येथे तर पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी शासनाकडून मुद्रांक विक्रेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाकडून मुद्रांक विक्रेत्यांचे दोन वर्ग ठरवून दिले आहेत. यामध्ये पहिल्या वर्गात मुद्रांक विक्रेता, तर दुसºया वर्गात मुद्रांक लिहिणारा असे वर्गीकरण केले असतानादेखील नियम धाब्यावर बसवून मुद्रांक विक्रेता मुद्रांक लिहित आहे, तर मुद्रांक लिहिणारा मुद्रांक विक्री करत आहे. नागरिकांना व पक्षकारांना जमीन खरेदी-विक्री, तारण गहाण, बँक कर्ज, दत्तकपत्र, मृत्युपत्र, संचकारपत्र, हक्कसोडपत्र तसेच शासनाच्या विविध योजनेसाठी प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी मुद्रांकांचा वापर केला जातो. त्यामुळे या सर्व शासकीय कामाकरिता मुद्रांकाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
शासकीय कामात या अतिमहत्त्वाच्या मानल्या जाणाºया मुद्रांकाच्या खरेदीसाठी मुद्रांक विक्रेत्यांकडे जावे लागते. मुद्रांकाच्या लवकर मिळण्यावर व लिहिण्यावरच पुढील सर्व शासकीय कामाची रुपरेखा ठरते. शासकीय काम सहा महिने थांब या म्हणीप्रमाणे आपले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांंची खटाटोप सुरु असते. त्याचा गैरफायदा मुद्रांक विक्रेते घेत असून १०० रुपये किमतीचे मुद्रांक (स्टँप) १३० ते १५० या चढ्या दराने विक्री करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची या मुद्रांक विक्रेत्यांकडून आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. नागरिकही आपले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तोंड बंद करून आहेत. तर जे पक्षकार जादा पैसे देत नाहीत त्याला मात्र या मुद्रांक विक्रेत्यांकडून कामासाठी टाळटाळ केली जाते व वारंवार या विक्रेत्यांच्या खोक्यांकडे मुद्रांक खरेदी व लिहिण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन कामकाज बंद झाल्यानंतर मुद्रांकाची विक्री करणे हे बेकायदेशीर आहे. मात्र मुद्रांक विक्रेत्यांकडून रात्री कामकाज बंद झाल्यावर तर सुट्टीच्या दिवशी येणाºया पुढील कामाच्या दिवसाची तारीख टाकून बेकायदेशीररित्या जादा दराने मुद्रांक विक्री सुरू आहे. या गंभीर बाबीकडे मात्र पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयाकडून सोयिस्कर दुर्लक्ष होत असल्याने अधिकारी वर्गाचे व मुद्रांकविक्रेत्यांचे काही आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा सध्या तालुक्यात जोर धरत आहे. या पाठबळामुळे आॅनलाईन मुद्रांक विकत घेत असताना मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचेही समोर आले आहे. हजार रुपयाच्या मुद्रांकासाठी दोनशे रुपये आॅनलाईन शुल्क वेगळे आकारून पक्षकारांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.त्याचबरोबर मुद्रांक लिहिण्यासाठी वारेमाप शुल्क आकारले जाते व यात कार्यालयीन कर्मचाºयांसाठी पक्षकारांकडून जादा मोबदला घेतला जातो.प्रशासनाने लक्ष घालावे : बाजीराव उदाळेपन्हाळा तालुका डोंगराळ व दुर्गम आहे. या ठिकाणी दळणवळणाची साधने ही अपुरे आहेत. तालुक्यातील अतिदुर्गम भागातून पक्षकारांना शासकीय कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी यावे म्हटले तरी वेळ व पैसा दोन्ही वाया जातो. तर कामानिमित्त दररोज शासकीय कार्यालयाकडे येणे म्हटले तर ते शक्य होत नाही. याचा गैरफायदा घेत तुमचे काम लवकर करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे सांगून मुद्रांक विक्रेत्यांकडून शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा चढ्या दराने कामाचा मोबदला व मुद्रांकाची विक्री होत असल्याने सर्वसामान्य नागरिक यात भरडला जात आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा, अशी मागणी वाघवेचे माजी सरपंच बाजीराव उदाळे यांनी केली.