रिक्षाचालकांकडून भाजीपाला विक्री, सेंट्रिंगचे काम
लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचा रोजगार थांबला. लॉकडाऊनमध्ये रिक्षासेवा देण्यासही बंदी होती. त्यामुळे घरखर्च भागविण्यासाठी गेल्या आठ महिन्यांत या रिक्षाचालकांनी भाजीपाला, दूध, मास्क विक्री केली, सेंट्रिंगचे काम केले. मित्रमंडळी, नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेऊन अनेकांनी कुटुंबाचा खर्च भागविला. सध्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने रिक्षांऐवजी आपल्या दुचाकीवरून अथवा चारचाकीतून बहुतांश पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत सोडण्यास येत आहेत. त्यामुळे रिक्षा व्यवसायाला अद्यापही गती मिळाली नसल्याचे विद्यार्थी वाहतूक ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. आम्हा रिक्षाचालकांना सरकारने दहा हजार रुपयांची मदत द्यावी अथवा विनातारण आणि कमी व्याजदरात बँकांनी १० हजार रुपयांचे कर्ज द्यावे, अशी मागणी केली. त्याबाबत लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली. पण, त्यावर अद्याप काहीच झाले नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शहरातील रिक्षा : ८५०
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या जिल्ह्यातील रिक्षा : १५००
या वाहतुकीच्या माध्यमातून रोजगार मिळालेल्यांची संख्या : सुमारे अडीच हजार