कोल्हापूर : मुस्लिम बोर्डिंग चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने शिवनेरी स्पोर्टस्वर २-० अशा गोलफरकाने मात करीत उपांत्यफेरीत धडक मारली. बुधवारी झालेल्या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सचिन गायकवाडला, तर लढवय्या खेळाडूंचा बहुमान इंद्रजित पाटील यांना देण्यात आला. शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी प्रारंभापासून शॉर्ट पासवर भर देत खेळाला सुरुवात केली. यामध्ये बालगोपाल तालीम मंडळाकडून तिसऱ्याच मिनिटाला झालेल्या चढाईमध्ये सचिन गायकवाडने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेल्याने त्यांची संधी हुकली. पाठोपाठ बालगोपाल तालीम मंडळाच्या जयकुमार पाटीलच्या पासवर ऋतुराज पाटीलची संधी हुकली. बालगोपाल तालीम मंडळाकडून होणारे सततचे आक्रमण रोखण्यासाठी शिवनेरी स्पोर्टस्कडून भारत लोकरे, सूरज जाधव, दीपक राऊत, युवराज पाटोळे यांनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या चढाया फोल ठरल्या. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी गोलचे खाते उघडता आले नाही. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सामना अत्यंत वेगवान झाला. सामन्याच्या ६५व्या मिनिटाला ‘बालगोपाल’च्या रोहित कुरणेच्या पासवर बबलू नाईकने गोल नोंदवित सामन्यात संघाचे खाते उघडले. हे खाते कमी करण्यासाठी शिवनेरी स्पोर्टस्कडून सैय्यद अलहूक, सूरज जाधव व युवराज पाटोळे यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. सामन्याच्या ७० व्या मिनिटाला बालगोपाल तालीम मंडळाच्या श्रेयस मोरेने गोल नोंदवीत सामन्यात २-० अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत अबाधित राहिली. (प्रतिनिधी)
‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत
By admin | Published: April 22, 2015 11:33 PM