लोकमत न्युज नेटवर्क
सेनापती कापशी : पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगाने पसरत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे. याकरिता सेनापती कापशी (ता. कागल) येथील कोविड केंद्र हे चिकोत्रा खोऱ्यातील पंचवीस गावांतील रुग्णांना जीवदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सेनापती कापशी (ता. कागल) येथे शशिकांत खोत यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या कोविड केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोरोनाची तिसरी लाट देशात येऊच नये अशी प्रार्थना करूया. पण जर लाट आलीच तर ऑक्सिजन, बेड व औषधे याबाबतीत कोणतीच कमतरता न ठेवता स्वयंपूर्ण होऊया. याकरिता आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले.
चिकोत्रा खोऱ्यातील रुग्णांना उपचारासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. रुग्णांना वेळेत व चांगले उपचार मिळावेत याकरिता मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने हे कोविड केंद्र उभारले आहे. याठिकाणी सुसज्ज वीस ऑक्सिजन बेड व पंचवीस नाॅन ऑक्सिजन बेड अशा एकूण ४५ बेडची सोय करण्यात आली आहे असे शशिकांत खोत यांनी सांगितले. यावेळी भय्या माने, जि.प.सदस्या शिल्पा खोत, सरपंच श्रद्धा कोळी, पं.स.सदस्य दीपक सोनार, सुनील चौगले, प्रविण नाईकवाडे, सागर पाटील, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
२९ सेनापती कापशी मुश्रीफ
फोटो:- सेनापती कापशी (ता.कागल) येथे कोवीड केंद्राचे उद्घाटन करताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी भय्या माने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, शशिकांत खोत , जि.प.सदस्या शिल्पा खोत, सरपंच श्रद्धा कोळी, माजी सभापती दत्तात्रय वालावलकर,आदी उपस्थित होते.