कोल्हापूर : वाई हत्याकांडातील(जि. सातारा) संशयित नराधम व न्यायालयीन बंदी (क्रमांक १७९ /१८) असलेला संतोष गुलाबराव पोळ (रा. धोम, ता. वाई) याची गुरुवारी प्रशासकीय कारणाने कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा येथून पुणे येथील येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. पोळ याच्याकडे येथील मध्यवर्ती कारागृहात पिस्तूल सापडले; पण तपासाअंती ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी कारागृह पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी गुरुवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी कर्मचारी यांचे जबाब नोंदविले. त्यामुळे याप्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पुढील आठवड्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी पत्रकारांना सांगितले.यावेळी शरद शेळके म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन बंदी (विचाराधीन बंदी) संतोष पोळ याच्याकडे पिस्तूल असल्याचा व्हिडीओ व्हॉट्स अॅपवरून प्रसारित झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याची गंभीर दखल उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी घेतली. गेले दोन दिवस त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. यामध्ये पोळ याच्याकडे असलेले पिस्तूल हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले; पण त्याला कारागृहात कोणी मोबाईल दिला, याचा तपास केला. त्यामध्ये तो कारागृहातील संशयित अमोल पवारने दिल्याचा संशय आहे.याचबरोबर त्याने पिस्तूल तयार करण्याचे प्रशिक्षण कारागृहात असलेल्या मुंबईतील गॅँगस्टरमधील एका गुंडाकडून घेतल्याची माहिती तपासात पुढे आली.पोळ दोन वर्षे कारागृहातसंतोष पोळ याच्यावर सहा खुनांचे गुन्हे दाखल आहेत. तो न्यायालयीन बंदी आहे. त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात ३० सप्टेंबर २०१६ ला आणण्यात आले. गेली दोन वर्षे तो कारागृहात होता. या खूनप्रकरणी त्याला वरचेवर सातारा येथे सुनावणीसाठी नेण्यात येत असे. त्यावेळी नातेवाइकांकडून त्याने मोबाईलमध्ये सीमकार्ड घेतले असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे शेळके यांनी यावेळी सांगितले.येरवडा कारागृहातून घ्यावा लागणार ताबाकोल्हापूर मध्यवर्ती कारागृह प्रशासन व अधिकारी, कर्मचारी यांची बदनामी केल्याबद्दल संतोष पोळवर जुना राजवाडा पोलिसांत बुधवारी (दि. २८) गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तुरुंगाधिकारी राजेंद्र जाधव (रा. कृष्णापूर, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांना न्यायालयीन आदेशानंतर येरवडा कारागृहातून पोळचा ताबा घ्यावा लागणार असल्याचे शरद शेळके यांनी सांगितले.सुरक्षा चोख ठेवा : मध्यवर्ती कारागृहात तीन वर्षांपूर्वी गांजा पार्टी प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर आता संतोष पोळचे बनावट पिस्तुलाचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवा, अशा सूचना स्वाती साठे यांनी कारागृह प्रशासनाला दिल्या.
संतोष पोळची ‘येरवड्या’त रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:05 AM