कोल्हापूर : सोशल मीडियावर सुंदर मुलीचे फोटो दाखवून तरुणाला भुरळ पाडायची. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. दररोज चॅटिंग करून त्याला जाळ्यात ओढायचे. बेधुंद झालेल्या तरुणाला व्हिडीओ कॉल करून विवस्त्र व्हायला लावायचे. त्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करायचे, असा नवा ऑनलाईनवरील फसवणुकीचा फंडा तरुणांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध रहा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.सध्या प्रत्येकाकडे मोबाईल, संगणक, टॅब आहेत. त्यामुळे इंटरनेट हे अविभाज्य अंग बनले आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटॉकसारख्या माध्यमांतून नवीन मित्र जोडले जातात. हाय हॅलोपासून चर्चेचे भावनिक नाते निर्माण होते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणुकीचा गळ टाकून बसले आहेत. अशा गुन्हेगारांकडून तरुणांच्या सोशल अकाउंटवर अनोळख्या मुलीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते.
प्रोफाईलवर सुंदर मुलीचा फोटो असतो. पण त्या मुलीला कधीही पाहिले नसतानाही तिची फ्रेंड रिक्वेस्ट तरुणाकडून स्वीकारली जाते. नव्या मैत्रिणीकडून संदेशांची देवाणघेवाण सुरू होते. तरुणाचे नाव, पत्ता अशी माहिती घेत रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरू होतात. अशा चॅटिंगमध्ये अचानक तरुणाला व्हिडीओ कॉल येतो. त्याला विवस्त्र व्हायला सांगितले जाते. काही तरुण बेधुंद होऊन यात अडकतात. त्यानंतर त्या मुलीच्या अकौंटमागे दडलेला गुन्हेगार पैशाची मागणी करतो.
नाही दिले तर विवस्त्र व्हिडीओ व फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेले तरुण त्याच्या मागणीप्रमाणे भरपूर पैसे देतात, अनेकजण स्वतःचे बरेवाईट करून घेण्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे अशा अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना प्रत्येकाने सावधानता बाळगावी. गैरप्रकार घडला असेल तर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.