कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर महापालिकेने स्वॅब संकलन आणि रुग्ण शोध मोहिमेची कार्यपद्धती बदलल्यामुळे अहवाल झटपट मिळू लागले. तर दुसरीकडे कान्ट्रॅक्ट ट्रेसिंगही लवकर होऊ लागले आहे.
गेल्या महिन्यापर्यंत शहरातील ११ आरोग्य केंद्रांवरील नागरिकांचे स्वॅब आयसोलेशन रुग्णालयात आणले जात असत. त्या ठिकाणी या सर्वांची नोंद करून हे स्वॅब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क प्रयोगशाळेत पाठवण्यात येत असत. यामध्ये १८ ते २० तास जात असत. शहरातील हजार, बाराशे हे स्वॅबचे नमुने एकदम प्रयोगशाळेत गेल्यानंतर त्यांनाही ते सर्व तपासून त्याचे अहवाल तयार करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते तपासून अहवाल मिळण्यासाठी आणखी २४ तास जात असत.
म्हणजे स्वॅब घेतल्यानंतर ४८ ते ५० तासांनी महापालिकेला आणि संबंधित नागरिकांना अहवाल काय आला आहे याची माहिती मिळत असे. यानंतर आलेल्या सर्व अडीचशे, तीनशे हे पॅझिटिव्ह अहवालांपैकी कोण कोणत्या वाॅर्डामध्ये आहे ते निश्चित होण्यासाठी आणखी कालावधी जात असे. त्यामुळे काॅन्ट्रक्ट ट्रेसिंगलही विलंब होत असे. परिणामी ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ बनली होती. महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यावर बऱ्याच वेळा चर्चा होत होती.
अखेर आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी याबाबतच्या समन्वयाची जबाबदारी उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे सोपवली. आडसूळ यांनी जिल्हा परिषदेमध्ये बाराही तालुक्यातील काॅन्ट्रॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी एकहाती सांभाळली होती. रात्री बारा, एकपर्यंत त्यांच्या हाताखालचे सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी घरातूनदेखील प्रत्येक तालुक्याला याद्या पाठवत असत. या अनुभवाचा आडसूळ यांनी उपयोग करून घेतला.
चौकट
प्रत्येक आरोग्य केंद्रातून स्वॅब थेट प्रयोगशाळेत
आधी सर्व आरोग्य केंद्रांवरील स्वॅब आयसोलेशनला एकत्र आणून मग शेंडा पार्क प्रयोगशाळेकडे पाठविले जात होते आडसूळ यांनी या प्रत्येक आरोग्य केंद्राला कशाची गरज आहे, याची माहिती घेतली. त्यांना स्वॅब संकलनासाठी आवश्यक किट दिले. केएमटीची सोय केली. नोंदणीसाठी आवश्यक कर्मचारी दिले. त्यामुळे स्वॅब संकलन झाल्यानंतर ते थेट प्रयोगशाळेत जाऊ लागले. त्या ठिकाणी १००/१५० अशा संख्येने स्वॅब जाऊ लागले आणि तातडीने तपासलेही जाऊ लागले. अहवालही लवकर मिळू लागले.
चौकट
काॅन्ट्रॅक्ट ट्रेसिंगही तत्काळ
स्वॅबचा अहवाल आल्यानंतर संबंधित पाॅझिटिव्ह रुग्णाच्या काॅन्ट्रॅक्टमधील नागरिक शोधण्यातही वेळ जायचा. कारण रुग्ण कोणत्या वाॅर्डात हे संपूर्ण यादी पाहून निश्चित केले जात होते. परंतु यासाठी आडसूळ यांनी महापालिका आणि माध्यमिक शाळेतील शिक्षंकाना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी एका समन्वयकाची नियुक्ती केली. त्यामुळे अहवाल आल्यानंतर तातडीने रुग्ण कोणत्या वाॅर्डातील आहे त्यांना तातडीने मेसेज जाऊ लागला. त्यामुळे काॅन्ट्रॅक्ट ट्रेसिंग विनाविलंब होऊ लागले.